Pimpri News : प्रभागाची लोकसंख्या कमी होणार; प्रचाराचा ताणही कमी होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 128 वरुन 139 झाल्याने निवडणुकीसाठी नव्याने होणा-या प्रभागातील लोकसंख्या कमी होणार आहे. त्यामुळे प्रभागातील मतदारसंख्याही रोढावणार आहे. परिणामी, उमेदवारांचा प्रचाराचा ताण किंचित्सा कमी होणार आहे. मात्र मतदारसंख्या कमी असल्याने दिग्गजांची गणिते बिघडू शकतात कारण, मतदार कमी झाल्याने उमेदवारांची संख्या वाढू शकते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी निवडणूक त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने होणार आहे. निवडणूक 2011 च्या जनगणेनुसार होणार आहे. त्यानुसार शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्यापैकी 13 लाख 50 हजार मतदार आहेत. मतदारनोंदणी सुरु असून 14 लाखापर्यंत मतदारसंख्या होऊ शकते. 2011 च्या जनगणेनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात येत आहे. कच्चा आराखडा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत पूर्ण करुन निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे.

महापालिकेची 2017 ची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने झाली होती. त्यावेळी महापालिकेची नगरसेवक संख्या 128 होती. एका प्रभागाची लोकसंख्या 36 हजार ते 44 हजार होती. तर, 32 प्रभाग होते. आगामी निवडणूक तीनसदस्यीय प्रभाग पद्धतीने म्हणजेच तीन नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविली आहे. पिंपरी महापालिकेच्या नगरसेवक संख्येत 11 ने वाढ झाली. त्यामुळे 128 वरुन नगरसेवकांची संख्या 139 वर पोहोचली आहे.

2011 चीच लोकसंख्या असल्याने आणि नगरसेवकांमध्ये वाढ झाल्याने प्रभागातील लोकसंख्या कमी होणार आहे. एकूण 46 प्रभाग असणार आहेत. त्यातील 45 प्रभाग तीन नगरसेवकांचे तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा राहणार आहे. एका प्रभागाची लोकसंख्या किमान 33 हजार 559 ते कमाल 41 हजार 17 असेल. सरासरी 37 हजार 288 लोकसंख्या राहील. मागील निवडणुकीच्या तुलनेत सुमारे तीन हजारांनी प्रभागातील लोकसंख्या कमी होणार आहे. लोकसंख्या कमी झाल्याने आपोआप मतदारसंख्याही कमी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळणार असून किंचित्सा प्रचाराचा ताणही कमी होणार आहे.

तर, 3 हजार 102 ब्लॉक राहतील. अनुसूचित जातींच्या (एससी) राखीव जागेत दोनने वाढ होणार आहे. त्यांच्यासाठी 22 जागा राखीव राहणार आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी)साठी 3 जागा राखीव राहणार आहेत. उर्वरित जागा ओबीसी, खुल्यागटासाठी असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.