Pune News : नोव्हेंबरमध्ये 8 लाख पुणेकरांना हवी कोविशिल्ड, तर 98 हजार लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन

एमपीसी न्यूज : पुण्यात सहा महिन्यांत सुमारे 37 लाख 90 हजार 27 डोस देण्यात आले असून, त्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे. असे असले, तरी पुणे जिल्ह्यात तब्बल नऊ लाख लाभार्थ्यांना या नोव्हेंबर महिन्यात दुसरा डोसची प्रतीक्षा आहे. यापैकी 8 लाख 4 हजार जणांना कोविशिल्ड, तर 98 हजार लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लशीचा डोस मिळणे बाकी आहे.

संपूर्ण राज्यात पुणे महापालिकेच्या हद्दीत लसीकरणाचा वेग सर्वाधिक असून, लसीकरणाबाबत महापालिकेचा क्रमांक एक आहे. दि. 1 मे पासून 18 च्या पुढील वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये कोविशिल्डचे 18 लाख 35 हजार 935 तर कोवॅक्सिनचे 1 लाख 86 हजार 397 डोस देण्यात आले. याशिवाय खासगी रुग्णालयात कोविशील्डचे 16 लाख 56 हजार 817 तर कोवॅक्सिनचे 70 हजार 41 डोस देण्यात आले.

राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी पुणे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात दुस-या डोसच्या प्रतीक्षेत 9 लाख लाभार्थी आहेत. ही संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्या खालोखाल मुंबईत 6 लाख 40 हजार, नागपूरमध्ये 5 लाख 42 हजार, ठाणे 3 लाख 50 हजार आणि कोल्हापूरमध्ये 3 लाख लाभार्थी वेटिंगवर आहेत.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्ये मिळून 18 वर्षे व त्यापुढील लाभार्थ्यांची संख्या 83 लाख 42 हजार इतकी आहे. त्यापैकी 78 लाख 89 हजार म्हणजेच 94 टक्के जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. 42 लाख 77 हजार म्हणजेच 51 टक्के लाभार्थ्यांना दुसरा डोस मिळाला आहे. पहिला आणि दुसरा डोस वेगाने करण्याबाबत राज्यात पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो, तर मुंबई एकूण लक्ष्य असलेल्या लाभार्थ्यापैिकी सर्वांत जास्त लसीकरण करणारा जिल्हा ठरला असून, त्यांनी 98 टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस, तर 60 टक्के लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 18 वर्षे व त्यापुढील वयोगटात 9 कोटी 85 लाख 33 हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी 73 टक्के म्हणजे 6 कोटी 73 लाख जणांना पहिला डोस मिळाला आहे. 34 कोटी म्हणजे 3 कोटी 11 लाख जणांना दुसरा डोस मिळाला आहे. उर्वरित 66 टक्के लाभार्थी दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.