Washington: ‘व्हाइट हाऊस’ने भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधानांना ‘या’ कारणासाठी केले ट्विटरवर ‘अनफॉलो’

एमपीसी न्यूज – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘व्हाइट हाऊस’च्या ट्विटर हँडलने फॉलो केले होता. केवळ दौरा होऊन गेल्यामुळे आता त्यांना अनफॉलो केले असल्याचे स्पष्टीकरण व्हाईट हाऊसच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘व्हाइट हाऊस’च्या ट्विटर हँडलने अनफॉलो केल्यानंतर भारतातून नाराजी व्यक्त केली जात आहे. अचानक अनफॉलो करण्याचा निर्णय का घेण्यात आला यासंदर्भात व्हाइट हाऊसने भूमिका स्पष्ट केली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या ‘व्हाइट हाउस’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतातील काही ट्विटर अकाउंट्सना फॉलो करण्यात आले होते. पण, त्यानंतर अचानक काल (दि.२९) व्हाइट हाउसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय ट्विटर अकाउंट्सना अनफॉलो केले.

या प्रकाराबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘आमचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना व्हाइट हाउसनं अनफॉलो केल्यामुळे मी खूप निराश झालोय. परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो’, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.

या बाबत व्हाइट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यामागील कारण स्पष्ट केले. “व्हाइट हाऊसचे ट्विटर हँडल अमेरिकन सरकारच्या इतर ट्विटर हँडलप्रमाणेच चालविले जाते. राष्ट्रध्यक्षांचा एखाद्या देशात दौरा असेल, तर त्या दौऱ्यापूर्वी यजमान देशातील महत्त्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो केले जाते. कारण दौऱ्याविषयीचे यजमान देशाच्या अधिकृत ट्विटर हँडल करण्यात आलेले ट्विट रिट्विट केले जातात. त्यानंतर पुन्हा अनफॉलो केलं जातं. केवळ दौऱ्यादरम्यान मर्यादित कालावधीसाठी असे केले जाते. हे केवळ भारतापुरतेच मर्यादित नाही तर सर्वच देशासाठी हा नियम लागू आहे,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेब्रुवारीतील नियोजित भारत दौऱ्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे ट्विटर हँडल, अमेरिकेच्या भारतातील दूतावासाचे ट्विटर हँडल आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांचे ट्विटर हँडल व्हाइट हाऊसने फॉलो केले होते. ते आता अनफॉलो करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.