Pune ; महापालिकेच्या 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; दोन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाने हाहा:कार माजविला आहे. आतापर्यंत नगरसेवक, पोलीस, लहान मुले आणि आता महापालिकेचे कर्मचारीही कोरोनाच्या तावडीत सापडले आहेत. महापालिकेच्या 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, भवानी पेठ आणि धनकवडीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

येरावड्यातील सहायक आरोग्य निरीक्षकासह गुलटेकडीतील एक मुकादम, भवानी पेठ आणि धनकवडीतील दोन सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भवानी पेठ आणि धनकवडीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तर, स्वच्छच्या दोन कचरा वेचकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४३ जणांची पुणे महापालिकेने तपासणी करून घेतली आहे. त्यांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे.

पुणेकरांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, यासाठी महापालिकेची सर्वच यंत्रणा रात्रंदिवस काम करीत आहे. लॉककडाऊनची कडक अंमलबजावणी करीत नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पुण्यात कोरोना झपाट्याने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत. तर 268 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हयात ॲक्टीव रुग्ण 1 हजार 383 असून कोरोनाबाधीत 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.