Pimpri: पिंपळेगुरव, निगडीतील पाणीपुरवठा विस्कळीत; आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश 

आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास; पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना स्थायीत बसू देणार नाही

भाजपचे नगरसेवक सागर आंगोळकर यांचा इशारा 

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी असलेले भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव परिसरातीलच पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना स्थायीच्या सभेला बसू दिले जाणार नाही, असा इशारा स्थायीचे समितीचे सदस्य सागर अंगोळकर यांनी दिला. तसेच निगडी, प्राधिकरणातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे यांनी देखील अधिका-यांना फैलावर घेतले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (मंगळवारी) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर स्थायी समितीमध्ये जोरदार चर्चा झाली.

भाजपचे नगरसेवक सागर आंगोळकर म्हणाले, पिंपळेगुरव परिसरातील गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. तसेच पुरेसे वेळ देखील पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली आहे. आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत नाही झाल्यास पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना स्थायी समितीच्या सभेत बसू दिले जाणार नाही. तसेच आपण स्वत: सुद्धा सभेला बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे अमित गावडे म्हणाले, निगडी, प्राधिकरणातील पाणीपुरवठा देखील विस्कळीत आहे. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. तसेच पुरेसा पाणीपुरवठा देखील होत नाही. यावर पाणीपुरवठा विभागाने तोडगा काढणे गरजेचे आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व परिसरात समान पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.