BNR-HDR-TOP-Mobile

दहावीनंतर पुढे काय ? करिअर निवडीच्या दिशा (भाग दुसरा)

एमपीसी न्यूज- जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचे निकाल जाहीर होतील. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते ती करियर निवडीची. कोणते करियर निवडावे याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था असते. कारण योग्य करियरची निवड ही विद्यार्थ्याला यशाच्या मार्गावर नेते तर चुकीचे करियर निवडल्यास विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते. शिवाय आयुष्यातील महत्वाची वर्षे वाया जातात. म्हणूनच एमपीसी न्यूज घेऊन येत आहे करियर निवडीवर मार्गदर्शन करणारी मालिका ‘दहावीनंतर पुढे काय ?’ यामध्ये मानसशास्त्रतज्ञ, करिअर मार्गदर्शक व समुपदेशक डॉ. समिता प्रशांत चव्हाण या मार्गदर्शन करणार आहेत.

करिअर निवडीच्या दिशा

करिअरची निवड हा विद्यार्थी आणि पालक या दोघांसाठीही अतिशय महत्वाचा आणि तितकाच काळजीचा विषय आहे. योग्य वयात योग्य करिअरची निवड केली, तर ती लौकिकार्थाने यशस्वी आयुष्याची पहिली पायरी ठरते. करिअर म्हणजे उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठता येणे. प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान असते, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्य या गोष्टी सुद्धा करिअर निवडीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित असतात.
जीवनाचा विकास साधायचा असेल तर प्रत्येकाने आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखून तसे क्षेत्र निवडावे. त्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा साध्य करावी. आत्मपरीक्षण, रुची असलेल्या क्षेत्राची निवड, निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा मिळविणे हि सर्वात महत्वाची त्रिसूत्री आहे. माहितीच्या विस्फोटात आणि अपेक्ष्यांच्या ओझ्याखाली दबणाऱ्या मुलांना आपण नक्की काय करू शकतो आणि काय करणे दीर्घकाळाच्या दृष्टीने योग्य असेल हे समजून घ्यायला मदत करणारे वस्तुनिष्ठ साधन म्हणजे कल चाचणी. करिअरला आवश्यक गुणसंपदा तुमच्या व्यक्तिमत्वात असेल तर तुम्हाला त्या करिअरमध्ये ‘स्कोप’ आहे.

पुस्तकी अभ्यासातल्या बुद्धिमत्तेला अकेडमिक इंटेलिजन्स म्हणतात. ज्याच्याकडे अकेडमिक इंटेलिजन्स आहे त्याने पुस्तकी अभ्यासाशी संबंधित क्षेत्रात करिअर करावे. दहावीत खूप टक्के मिळवून बोर्डात येतात व विज्ञान शाखेला जातात. बारावीला PCM, PCB किंवा PCMB हे विषय घेतात. मग बारावी सायन्सला बोर्डात येणे, मेडिकल, इंजिनिअर प्रवेश परीक्षा देऊन यश मिळविणे आणि जो हे करू शकेल तो बुद्धिमान. मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश न मिळाल्यास विज्ञानाच्या विषयांमध्ये प्युअर सायन्स करायचे. विज्ञान शाखेत प्रवेश नाही मिळाला तर वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यायचा. पण दहावीत वाणिज्य शाखेलाही प्रवेश मिळविण्याएवढे मार्क नसले तर मान खाली घालून कला शाखेला प्रवेश घ्यायचा अशी करिअरची उतरंड असते. हे सर्व चुकीच्या सूत्रांवर आधारित असते.

पुस्तकी अभ्यासातल्या बुद्धिमत्तेपलीकडे बुद्धिमत्तेचे एक फार मोठे क्षेत्र आहे. त्याचे नाव बिहेव्हियरल इंटेलिजन्स म्हणजेच रोजच्या जगण्या वागण्यातली बुद्धिमत्ता. लेखन, चित्रकला, खेळ, गायन, अभिनय, संगीत, कला, समाजकार्य, नेतृत्व, उद्योग व्यवसाय अशी अनेक क्षेत्र आहेत. हि मेडिकल/इंजिनीअर सहित अकेडमिक इंटेलिजन्स इतकीच महत्वाची आहेत. आता दहावीनंतरही करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. या दहावी बारावीनंतरच्या असंख्य पर्यायांपैकी नक्की कोणता पर्याय निवडावा हा प्रश्न नेहमीच ‘आ’ वासून उभा असतो. कोणता अभ्यासक्रम निवडावा? कसा निवडावा? पाल्याचा कल कसा ओळखावा? असे अगणित प्रश्न उपस्थित होतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विविध क्षेत्रातील करिअरच्या असंख्य वाटा उलगडून दाखवणारी, मान्यवरांकडून मार्गदर्शन देणारी संस्था म्हणजेच संकल्प सी सी. ए.

मार्गदर्शक-
डॉ. समिता प्रशांत चव्हाण
मानसशास्त्रतज्ञ, करिअर मार्गदर्शक व समुपदेशक
पत्ता-
संकल्प: ए सेंटर फॉर कॉम्पिटेन्सी असेसमेन्ट
322, गुरूदत्त अपार्टमेंट, दुसरा मजला, विठ्ठल मंदिर जवळ, नवी पेठ, पुणे-३०
मो.- 7028896981/82

HB_POST_END_FTR-A2