Pune : पोलीस हवालदाराला तीन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – पौड पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदाराला आज बुधवारी (दि.12) तीन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पौड येथील विश्रामगृहाजवळ रंगेहाथ पकडले आहे.

तात्यासाहेब रामचंद्र आगवणे (वय 48) असे लाच स्वीकारणा-या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदारावर पौड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार आगवणे हे करीत होते. आगवणे यांनी कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे सुरुवातीला पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती.

याची पडताळणी केली असता आगवणे यांनी पाच हजारांची लाच मागितल्याचे व तडजोडी अंती तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार सापळा रचून पौड येथील विश्रामगृहाजवळ तीन हजार रुपयांची लाच घेत असताना आगवणे याला रंगेहाथ पकडले.

ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.