Edible oil prices : खाद्यतेलांच्या किंमती कमी होणार ? आज महत्वपूर्ण बैठक 

एमपीसी न्यूज – देशात दिवसेंदिवस महागाई नवे उच्चांक गाठत आहे. इंधनाच्या किंमती, सर्वच सेवांचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक खाद्यतेलांच्या किंमती वाढल्याने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पण खाद्यतेलांच्या किंमती कमी होण्याची शक्यता असून, केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक विभागाचे अधिकारी यांची आज सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत खाद्यतेलाच्या साठ्यावर मर्यादा घालण्याविषयीच्या आदेशाचा आढावा घेतला जाणार आहे.

या संदर्भात सर्व राज्यांना केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक विभागाचे सचिव, सुधांशू पांडे यांनी लिहिलेल्या पत्रात, त्यांनी खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याविषयी, केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहीती दिली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने या उपाययोजना केल्या आहेत.

केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक विभाग सातत्याने खाद्य तेलाच्या किंमती आणि उपलब्धतेवर लक्ष ठेवून आहे. आगामी उत्सवांच्या काळात, खाद्यतेलाच्या किमतींची मागणी वाढण्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या किमती आणि उपलब्धता यावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी, केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि खाद्यतेल उद्योगांच्या संघटनाशी चर्चा केली. साठा किती आहे, ते उघड करण्याविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली. आणि त्यानंतर खाद्यतेले/तेलबियांच्या देशभरातील साठयावर साप्ताहिक पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक विभागाने एक पोर्टल तयार केले आहे.

त्यामुळे, आजच्या आढावा बैठकीनंतर देशातील खाद्यतेलांच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.