Pimpri News: गजानन बाबर यांच्या निधनाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पिंपरी-चिंचवडमध्ये रुजवणारा ज्येष्ठ नेता गमावला – अजित पवार

एमपीसी न्यूज – माजी खासदार गजानन बाबर यांच्या निधनाने जनसेवेला वाहून घेतलेलं, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारं नेतृत्व हरपलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पिंपरी-चिंचवडमध्ये रुजवणारा पहिल्या पिढीतील ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे. पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीतील, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील त्याचं योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी खासदार गजानन बाबर हे संघर्षातून पुढे आलेले लोकप्रतिनिधी होते. जनतेसाठी उपलब्ध असणारा नेता अशी त्यांची ओळख होती. नगरसेवक, आमदार, खासदार म्हणून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याचा, पिंपरी-चिंचवडच्या विकासात योगदान देण्याचा प्रयत्न केला.

त्यांचे निधन ही पिंपरी-चिंचवडच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. शोकाकूल बाबर कुटुंबीय, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या  शोकभावना व्यक्त केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.