Bopkhel News : ‘एनजीटी’त अडकलेल्या बोपखेलमधील मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरु

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) आक्षेप घेतल्याने बोपखेलमधील रखडलेले मैला शुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम पुन्हा सुरु झाले. लवादात योग्य ती बाजू मांडल्यानंतर काम करण्यास परवानगी मिळाली असून त्यानंतर काम सुरु झाले आहे. 6 हजार चौरस मीटर जागेत मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहेत. या कामाला गती देण्याच्या सूचना उपमहापौर हिरानानी घुले यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

याबाबतची माहिती देताना उपमहापौर घुले म्हणाल्या, अमृत योजनेतून बोपखेल येथे मैला शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार होते. त्यासाठी पाठपुरावा करुन निविदा प्रक्रिया करुन काम सुरुही झाले होते. पण, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) हरकत घेतली. त्यामुळे हे काम रखडले. नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने मैला शुद्धीकरण केंद्र उभारण्याची सूचना महापालिकेला केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रक्रिया केलेल्या पाण्याचे मानांकनाने बदलले. त्यानुसार प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे अपरिहार्य केले.

त्यामुळे सुधारित अंदाजपत्रक तयार करणे भाग पडले. यात मोठा कालावधी गेला. त्यात कोरोनामुळे मोठी कामे हाती घेतली जात नव्हती. आता कोरोनाचा आलेख घसरणीस आला आहे. मैलाशुद्धीकरण केंद्राचे सुधारित अंदाजपत्रक तयार करुन त्यास राज्याच्या नगरविकास खात्यासोबत झालेल्या बैठकीत मान्यता घेतली. त्यानुसार नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ठेकेदाराला कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिली असून काम सुरु झाले आहे.

सुधारित अंदाजपत्रकानुसार या मैलाशुद्धीकरण प्रकल्पांसाठी 10 कोटी 50 लाख, पंपिंग स्टेशनकरिता 1 कोटी 50 लाख आणि अल्ट्रा फिल्टरेशनकरिता  4 कोटी 50 लाख असे एकूण अंदाजे 16 कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 6 हजार चौरस मीटर जागेत मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहेत. या कामाची ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली असून एका वर्षाच्या कालावधीत काम पूर्ण होईल अशी माहिती उपमहापौर हिरानानी घुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.