Dehuroad : भारतातील सर्व आयुध निर्माण कारखान्यातील कामगार जाणार एक महिन्याच्या संपावर

आयुध निर्माण कारखान्यांच्या खाजगीकरणाला कामगार संघटनांचा विरोध

एमपीसी न्यूज – भारत देशात असलेल्या सर्व आयुध निर्माण कारखान्यांच्या खाजगीकरणाचा घाट सरकारने घातला आहे. हा घाट घालू नये, तसेच आहे त्या कारखान्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणून शस्त्र निर्मितीच्या बाबतीत सशक्त व्हावे. या मागण्यांसाठी आयुध निर्माण कारखान्यातील सर्व कामगार संघटनांनी विरोध दर्शवला आहे. तसेच येत्या मंगळवार (दि. 20) पासून एक महिन्याच्या संपावर जाणार आहेत.

ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉयी फेडरेशन, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या संघटनांनी याबाबतचे निवेदन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, ‘भारतात एकूण 41 आयुध (शस्त्रास्त्र) निर्मिती कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये सुमारे सव्वालाख कर्मचारी काम करतात. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) जे मानक तयार करून शस्त्रास्त्र बनवण्यास सांगते, त्यानुसार सर्व कारखान्यांमध्ये शस्त्रास्त्र बनवली जातात. कोणताही आयुध निर्माण कारखाना स्वतःहून नवीन शस्त्रास्त्र बनवत नाही. त्याबाबतची परवानगी देखील नाही.

सरकारने सुरुवातीला रेल्वेच्या खाजगीकरणाला सुरुवात केली. त्यामध्ये यश मिळताच सरकार आता आयुध निर्माण करणा-या कारखान्यांचे खाजगीकरण करण्याच्या तयारीत आहे. या कारखान्यांमधून देशाच्या संरक्षणासाठी काम करणा-या सशस्त्र बलांना शस्त्रे पुरवली जातात. कारखान्यातील गुणवत्ता, आधुनिकीकरणाचा अभाव, खर्च आणि अन्य बाबी पुढे करून या कारखान्यांचे खाजगीकरण करणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. हा निर्णय देशाच्या अहिताचा आहे. तसेच कामगारांच्या संसारावर गदा आणणारा आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

या निर्णयाविरोधात देशातील सर्व आयुध निर्माण कारखान्यातील सर्व कामगार येत्या 20 ऑगस्ट पासून एक महिन्याच्या संपावर जाणार आहेत. सरकारने कारखान्यांचे खाजगीकरण रोखावे. कारखान्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणावे, यामुळे शस्त्रांची गुणवता आणि कारखान्यांची उत्पादनक्षमता वाढेल. यासह संघटनांनी काही मागण्या केल्या आहेत.

ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉयी फेडरेशन, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अपर सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून या समितीने संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली आहे. दोन वेळा झालेल्या या चर्चेत कोणतीही फलनिष्पत्ती झालेली नाही. त्यामुळे कामगार संघटना एक महिन्याच्या संपावर जाण्याच्या निर्णयावर कायम आहेत, अशी माहिती भारतीय आयुध निर्माणियां राजपत्रित अधिकारी संघटना, आयुध निर्माणी देहूरोड शाखेचे सचिव, नितिन उरणकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.