Pimpri : मधुमेहावर आहार व व्यायामाने नियंत्रण मिळवणे शक्य – डॉ. चंद्रकांत कणसे

एमपीसी न्यूज –  मधुमेह म्हणजे रक्तातील साखर प्रमाणापेक्षा जास्त होणे. रक्तातील साखर खरे तर आपल्या पेशींना ऊर्जा देते; पण ही साखर रक्तात साठून राहते, तेव्हा ती आपल्या महत्वाच्या अवयवांना त्रासदायक ठरू शकते. आपल्या शरीरात स्वादूपिंड नावाच्या अवयवात इन्सुलिन तयार होते. इन्सुलिनचे प्रमाण कमी होते, तेव्हा मधुमेह होतो. मधुमेह नियंत्रणात येतो, तो केवळ आहार व व्यायामाने, असे मत डॉ. चंद्रकांत कणसे यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे ‘मधुमेह नियंत्रित करता येतो का’? या विषयावर आज रविवार (दि.१८) ऑगस्टला आयोजित व्याख्यानात डॉ. चंद्रकांत कणसे बोलत होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल, भीमसेन अग्रवाल, बहार शहा, जसविंदर सिंग सोखी आदी उपस्थित होते.

डॉ. चंद्रकांत कणसे म्हणाले, मधुमेह म्हणजे रक्तातील साखर प्रमाणापेक्षा जास्त होणे. मधुमेह हा एक असा आजार आहे. ज्यामध्ये शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण ज्याला आपण ग्लुकोज असे म्हणतो, ते अती प्रमाणात वाढते. वास्तविक ग्लुकोजमुळे शरीराला ऊर्जा मिळते. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातून ग्लुकोज तयार होत असते. मधुमेहामुळे शरीराला स्वादुपिंडात इन्सुलिनचा पुरवठा कमी होतो. ज्यामुळे रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण अनियंत्रित होऊन वाढू लागते. या आरोग्य स्थितीला मधूमेह अथवा डायबिटीज असे म्हणतात. योग्य आहार आणि नियमित व्यायाम केल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.