World Cup 2023 : अँजेलो मॅथ्यूज ठरला ‘टाइम आऊट’मुळे बाद होणारा जगातील पहिला फलंदाज

एमपीसी न्यूज – दिल्ली येथील अरुण जेटली मैदानावार (World Cup 2023) सुरू असलेल्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध ‘टाईम आऊट’ या कारणावरून बाद ठरविण्यात आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारे आऊट होणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर 1877 पासून कसोटी क्रिकेट खेळले जात आहे. यानंतर एकदिवसीय आणि टी-20 ला आंतरराष्ट्रीय स्वरूप आले. पण तिन्ही फॉरमॅटच्या 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने एखादा खेळाडू बाद झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूचा अशाप्रकारे ‘टाइम आउट’ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अँजेलो मॅथ्यूजची विकेट सोशल मीडियावर ट्रेडिंग झाली आहे.

सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर मॅथ्यूजने क्रीजवर येऊन हेल्मेट घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटला. त्यामुळे त्याने ड्रेसिंग रूममधून दुसरे हेल्मेट आणण्याचे संकेत दिले, पण त्यात बराच वेळ गेला. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने पंचांकडे मॅथ्यूजविरुद्ध ‘टाईम आऊट’ ची अपील केली. या अपीलवर पंच मारायस इरास्मसने त्याला बाद घोषित केले.

अँजेलो मॅथ्यूजने पंच आणि शकीबशी बोलून त्याच्या हेल्मेटचा तुटलेला पट्टाही दाखवला, मात्र बांगलादेशच्या कर्णधाराने अपील मागे घेण्यास नकार दिल्याने अँजेलो मॅथ्यूजला माघारी परतावे लागले.

Pimpri : पिंपरीच्या गौरव चौधरीची युवा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड

हे पाहून मॅथ्यूज खूप संतापला आणि त्याने सर्वांना त्याच्या हेल्मेटचा तुटलेला पट्टा सीमारेषेवर दाखवला आणि रागाच्या भरात तो जमिनीवर आपटला.

क्रिकेट खेळाचे संरक्षक असलेल्या मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या नियम 40.1.1 नुसार, जर एखादा फलंदाज बाद झाला (World Cup 2023) किंवा निवृत्त झाला, तर पुढचा फलंदाज नियमित वेळेत पुढच्या चेंडूला सामोरे गेला नाही, तर तो“टाइम आऊट’ मुळे बाद होऊ शकतो.

नियम काय काय आहे?

एमसीसीच्या नियमांनुसार, ‘विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, अंपायरने खेळ थांबवला नसेल तर पुढील फलंदाज किंवा इतर कोणत्याही फलंदाजाला विकेट पडल्यानंतर 3 मिनिटांच्या आत पुढील चेंडूला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे आवश्यक असते.

ही आवश्यकता पूर्ण न केल्यास, येणाऱ्या फलंदाजाला “टाइम आऊट’ देण्यात येईल, हा नियम आहे. तथापि, मॅथ्यूजच्या बाबतीत आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या खेळाच्या संबंधित नियम लागू झाला आहे. आयसीसी द्वारे विश्वचषक 2023 साठी हा कालावधी 3 मिनिटावरून 2 मिनिटे करण्यात आला आहे. एरवी हा कालावधी 3 मिनिटाचा असतो. त्यामुळे टाइम आऊट या कारणावरून बाद होण्याचा विचित्र विक्रम मॅथ्यूजच्या नावे जमा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.