YCMH News : वायसीएम रुग्णालयात ओपीडी, शस्त्रक्रिया सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. इतर आजारांच्या रुग्णांचा विचार करता वायसीएम रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात ओपीडी सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयात आता शस्त्रक्रियादेखील सुरू झाल्या आहेत. जून महिन्यात जवळपास 400 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे इतर आजारांच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

शहरात फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत राहिली. परिणामी, एप्रिलमध्ये वायसीएम रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दैनंदिन ओपीडी बंद ठेवण्यात आली. या काळात अत्यावश्यक आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू होत्या. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर येथे उपचार करण्यात येत होते. सद्यस्थितीतही रुग्णालयात काही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच शहराबाहेरील रुग्णही वायसीएममध्ये उपचार घेण्यासाठी येतात. मागील वर्षी शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. तेव्हा रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्याकाळात मार्च ते नाव्हेंबरपर्यंत ओपीडी बंद होती. नाव्हेंबरनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने 3 नोव्हेंबरपासून ओपीडी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर रोज जवळपास 800 ते 1 हजार रुग्णांची ओपीडी होत होती.

एप्रिल आणि मे महिन्यात 759 शस्त्रक्रिया

कोरोना रुग्णांसाठी वायसीएम रुग्णालय राखीव ठेवण्यात आले होते. या काळात अत्यावश्यक आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू होत्या. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात रुग्णालयात 759 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ”सद्यस्थितीत बाह्यरुग्ण विभागात ओपीडी सुरू झाली आहे. तसेच शस्त्रक्रियादेखील सुरू झाल्या आहेत. कोरोनाकाळात फक्त अत्यावश्यक आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू होत्या”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.