YCMH : वायसीएमच्या गल्ल्यावर बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्याचा डल्ला

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCMH)अत्यावश्यक विभागाच्या ‘कॅश काउंटर’वर बोगस पावतीद्वारे हजारो रुपयाच्या रक्कमेवर बीव्हीजी कंपनीच्या कंत्राटी कर्मचा-याने डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी भरलेल्या रोख रक्कमेवर डल्ला मारत त्यांना बोगस पावत्या दिल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. ‘कॅश काउंटर’ तात्काळ बंद करुन त्या कंत्राटी कर्मचा-याची दुसरीकडे बदली केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCMH)ओपीडी बंद झाल्यानंतर अत्यावश्यक विभागाचे कॅश काउंटर सुरु असते. रुग्णालयातील 44 नंबरच्या एक ‘कॅश काउंटर’ वर दुपारनंतर नातेवाईकांची सतत वर्दळ असते. दररोज हजारो रुपयाच्या पावत्याद्वारे रोख रक्कम रुग्णालयात जमा होत होती. मात्र, कंत्राटी कर्मचा-याने शक्कल लढवून बोगस पावत्या बनवून ‘वायसीएम’च्या हजारो रुपयाच्या रकमेवर डल्ला मारला आहे.

Pune : पुण्याचे सह आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलीस आयुक्त पदी बदली

हा कंत्राटी कर्मचारी बीव्हीजी ठेकेदार कंपनीकडे कामाला आहे. गेल्या दहा महिन्यापासून रुग्णालयात जमा होणारी रोख रक्कम तो कर्मचारी गायब करत होता. दुपारी दोन ते रात्री दहा वेळेत रुग्णालयातील कॅश काउंटरवर तो काम करत होता. ‘कॅश काउंटर’ तत्काळ बंद करून कंत्राटी कर्मचा-याची दुसऱ्या वाॅर्डमध्ये बदली केली आहे. जानेवारीपासून त्याने केलेल्या सर्व पावत्याची माहिती घेतली जात आहे. प्राथमिक तपासात तफावत आढळून येत आहे.

याबाबत वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे म्हणाले, बिव्हीजी कंपनीचा एक कर्मचारी होता. प्राथमिक चौकशीत अफरातफर झाल्याचे दिसते. रक्कम किती आहे, याची माहिती काढत आहोत. जमा केलेल्या पावत्या आणि भरणा केलेल्या पैशांची तफावत काढली जात आहे. हजारांमध्ये हा अपहार आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

कंत्राटी कर्मचाऱ्याकडे कॅश कॉउंटरची जबाबदारी का दिली; आपचा सवाल

कॅश कॉउंटरवर महापालिकेच्या आस्थापनवरील लिपिक किंवा लेखापालची जबाबदारी असताना वायसीएम प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्याकडे तिथे काम करण्याची जबाबदारी कशी दिली? कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याऐवजी फक्त अंतर्गत बदली करून डॉ. राजेंद्र वाबळे या सर्व प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करत आम आदमी पार्टीने वाबळे यांना निलंबित करण्याची मागणी केली. अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे,सचिव स्वप्निल जेवळे, प्रशासकीय आघाडी अध्यक्ष यल्लाप्पा वाळदोर, उद्योग आघाडी अध्यक्ष मोहसीन गडकरी, सह सचिव डॉ. संतोष गायकवाड यांनी वायसीएमला भेट दिली. दरम्यान, याबाबत बिव्हीजी कंपनीची बाजू समजू शकली नाही. त्यांची बाजू येताच बातमीमध्ये अपडेट केली जाईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.