Talegaon Dabhade: मावळवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी 1,111 दाम्पत्यांनी घातले सत्यनारायणाला साकडे

पूरग्रस्त कुटुंबांना मावळातील प्रत्येक गावातर्फे एक गाय व एक म्हैस देण्याचा संकल्प

एमपीसी न्यूज – मावळवासीयांची सुख-समृद्धी तसेच महाराष्ट्रावरील विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांवरील महापुराचे संकट दूर व्हावे तसेच संपूर्ण राज्यावर निसर्गाची कृपादृष्टी राहावी, यासाठी तब्बल 1,111 दाम्पत्यांनी सामूहिक महापूजा घालून भगवान श्री सत्यनारायण यांना साकडे घातले. माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात या सामूहिक सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते.

मावळातील पावसाने साथ दिल्यामुळे सुखशांती लाभावी म्हणून या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते, पण अतिवृष्टीच्या थैमानामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यावर महापूराचे भीषण संकट ओढावले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मावळ तालुक्यातील रहिवाशांनी सढळ मदतीचा हात पुढे केलेलाच आहे. त्याच बरोबर हे संकट दूर होऊन राज्यात सुबत्ता यावी, यासाठी परमेश्वराला सामूहिक साकडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या महापूजेच्या निमित्ताने पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही शेळके यांनी केले होते.

महापुजेच्या निमित्ताने शेळके परिवाराच्या वतीने एका पूरग्रस्त कुटुंबाला देण्प्रायासाठी प्रातिनिधीक स्वरुपात एक गाय-वासरू व एक म्हैस ‘खिलार महाराष्ट्राची शान’ ग्रुपकडे सोपविण्यात आली. मावळातील प्रत्येक शहराने व गावानेही एक गाय व एक म्हैस या प्रमाणे या गरीब कुटुंबाना यासाठी मदत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सुनील शेळके फाऊंडेशन तर्फे पूरग्रस्तांसाठी 3000 ब्लँकेट व 4,000 पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असे साहित्य मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पाठवण्यात आले.

श्रीक्षेत्र गिरनार येथील थोर सत्पुरुष प.पू.श्री प्रमोद केणे, पंतप्रधानांचे अंगरक्षक गजानन पानसरे, हभप नितीन महाराज काकडे यांची विशेष उपस्थिती महापुजेस लाभली. त्यावेळी मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ टिळे, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, तळेगावचे नगरसेवक सुशील सैंदाणे, गणेश काकडे, संदीप नाना शेळके, संतोष शिंदे, अमोल शेटे, नीता काळोखे , वैशाली दाभाडे, शोभा भेगडे, प्राची हेंद्रे, इंदरशेठ ओसवाल, युवासेना प्रमुख अनिकेत घुले तसेच एकनाथ पोटफोडे आदी उपस्थित होते.

हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य मंडपात सकाळी नऊ वाजता ही सामूहिक सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. त्यात 1,111 दाम्पत्ये सहभागी होती. मावळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सामुहिक सत्यनारायण महापूजा आयोजन प्रथमच होत असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. गोकुळ किरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अत्यंत नियोजनबद्ध महापुजेचे सर्व उपस्थित भाविकांनी कौतुक केले.

या ऐतिहासिक महापूजेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्यास कामधेनूची पितळी मूर्ती देण्यात आली. पुरुष यजमानांना उपरणे-टोपी तर सुवासिनींना खण-नारळाची ओटी देण्यात आली. महाआरतीनंतर दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ सुमारे सहा हजार भाविकांनी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.