Talegaon Dabhade : रावसाहेब दानवे यांच्या घरभेटीने रवींद्र भेगडे यांच्या उमेदवारीच्या आशेला बळ

एमपीसी न्यूज -भाजपाचे केंद्रीय मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी मावळात बुथ प्रमुखांच्या विजयी मेळाव्याला जाताना अचानक वाहनांचा ताफा वळवत मावळ विधानसभेचे प्रमुख दावेदार असलेले रवींद्र भेगडे यांच्या घरचा पाहुणचार घेतल्याने रवींद्र भेगडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची मावळात चर्चा आहे. मेळाव्यात भाषणाची सुरुवात करताना व वरचेवर आमचं ठरलंय असं मिश्किलपणे बोलत रावसाहेब दानवे यांनी सर्वांनी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचे काम करा असे आवाहन केले आहे.

मावळ विधानसभेकरिता कामगार व पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी तिसर्‍यांदा दावा केला आहे, त्या पाठोपाठ मावळ प्रबोधनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भेगडे तसेच तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी दावा केला आहे. तिन्ही इच्छुक हे मातब्बर असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याची तालुक्याला उत्सुकता लागली आहे. मागील पंधरा दिवसांपासून तिन्ही इच्छुकांचे मावळात गावभेट दौरे सुरु आहेत. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समवेत भाजपातील प्रमुख पदाधिकारी व पक्षात नव्याने दाखल झालेल्यांचा मोठा राबता आहे.

रवींद्र भेगडे यांच्या मागे माजी आमदार दिगंबर भेगडे व पक्षातील जुने जाणते नेते व कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दिगंबर भेगडे हे कोअर कमिटीचे प्रमुख असून भविष्यात मावळात केशवराव वाडेकर यांची भूमिका साकारणार असल्याने त्यांच्या शब्दाला संघटनेमध्ये वेगळे महत्व असणार आहे. भाजयुमो अध्यक्षपदाच्या कार्यकाळात रवींद्र भेगडे यांनी गावोगावी जोडलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचाही फायदा त्यांना होत असताना दिसत आहे. रवींद्र भेगडेंनी काढलेल्या संघर्षयात्रेच्या दरम्यान याची प्रचिती स्पष्टपणे दिसून आली आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी रवींद्र भेगडे यांची घरी भेट देत पाहुणचार केल्याने मावळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मिस्टर क्लिन चेहरा असलेल्या रवींद्र भेगडे यांचे पक्षकार्य ही त्यांची जमेची बाजु ठरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.