Pimpri : गाडी पार्किंगमध्ये उभी आणि सीटबेल्ट न लावल्याचा गुन्हा ; वाहतूक पोलिसांचा अजब कारभार

एमपीसी न्यूज- गाडी पार्किंगमध्ये उभी असतानाही सीटबेल्ट लावला नाही म्हणून 200 रुपयांच्या दंडाची पावती पाठवून वाहतूक पोलिसांनी आपल्या गलथान कारभाराचा नमुना दाखवला आहे. गाडीच्या नंबरची सिरीज चुकीची नोंद केल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. मात्र त्यामुळे आपली चूक नसतानाही दंड आकारण्यात आल्यामुळे संबंधित गाडी मालकाला निष्कारण मनस्ताप भोगावा लागला आहे. त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून होत असलेल्या वाहतूक नियंत्रणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकाराबाबतची माहिती अशी की, कृष्णानगर चिंचवड येथे राहणारे बाजीराव सातपुते हे चिंचवडच्या एसकेएफ कंपनीत नोकरी करतात. सातपुते यांना गुरुवारी वाहतूक विभागाकडून एक एसएमएस आला. त्यामध्ये वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंधरा दिवसात 200 रुपये दंड भरण्यास सांगण्यात आले होते. सातपुते यांना काही केल्या हा प्रकार काय आहे हे लक्षात आले नाही.

त्यानंतर एसएमएसमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले असता त्यांनी केलेल्या वाहतूक नियमभंगाच्या गुन्ह्याची माहिती समजली. यामध्ये त्यांच्या
एम एच 14 ई वाय 0990 या गाडीचा क्रमांक टाकून सीटबेल्ट न लावता गाडी चालविल्याबद्दल 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र ती माहिती समजताच सातपुते चक्रावून गेले. कारण ज्या दिवशी व ज्या वेळी हा गुन्हा झाल्याचा उल्लेख होता त्यावेळी सातपुते यांची वॅग्नर कार घराच्या पार्किंगमध्ये उभी होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील सातपुते यांच्याकडे उपलब्ध आहे. असे असताना हा दंड कसा काय आकारण्यात आला हे सातपुते यांच्या लक्षात आले नाही.

वाहतूक विभागाकडून मिळालेल्या गाडीचा फोटो पाहताच सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. कारण तो फोटो वॅग्नर कारचा नसून फॉर्च्युनर गाडीचा होता. संबंधित फोटो व्यवस्थित आलेला नसल्यामुळे दोन्ही गाडीचे क्रमांक 990 असले तरीही सिरीज वेगळी होती. वाहतूक पोलिसांनी कोणतीही खातरजमा न करता सातपुते यांना दंडाची नोटीस पाठवली.

याबाबत बोलताना बाजीराव सातपुते म्हणाले, “माझी गाडी पार्किंगमध्ये उभी असतानाही वाहतूक पोलिसांच्या गलथानपणामुळे मला निष्कारण मनस्ताप सोसावा लागत आहे. गाडीचा नंबर व्यवस्थितपणे दिसत नसेल तर त्याची खात्री पोलिसांनी करायला हवी होती. तसे न करता अंदाजे कोणालातरी नोटीस बजावली आहे. आता माझी काहीही चूक नसताना या प्रकरणातून सुटण्यासाठी माझे नित्याचे काम सांभाळून पोलिसांकडे चकरा माराव्या लागणार आहेत. त्यामध्ये विनाकारण माझा पैसे, वेळ वाया जाणार आहे ”

सातपुते यांची वॅग्नर कार

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.