Pune : उद्योगपती अजिंक्य फिरोदिया यांच्यावर पत्नीचा चाकूहल्ला

एमपीसी न्यूज- कायनेटिक मोटोरॉयलचे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया यांच्यावर त्यांच्या पत्नीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी साडेसातच्या सुमारास घडली आहे. कौटुंबिक भांडणातून हा हल्ला झाला. या हल्ल्यात अंजिक्य यांच्या डोळ्याला आणि नाकाला दुखापत झाली आहे. अजिंक्य यांच्या तक्रारीवरून चतुःशृंगी पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य फिरोदिया (वय 40) हे मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या दोन मुलांसोबत तसेच आई (जयश्री) व वडील (अरुण) यांच्यासोबत जेवण करीत होते. त्याचवेळी त्यांची पत्नी अपर्णा ही तेथून जात असताना ‘तुम्ही माझ्याबद्दल काय बोलत आहात?, माझ्याबद्दल तुम्ही का बोललात?’ अशी विचारणा करीत पत्नीने अजिंक्यसोबत वाद घालायला सुरुवात केली. तिने अजिंक्य यांचे शर्ट फाडले. त्यानंतर स्वयंपाकघरात जाऊन चाकू घेऊन अजिंक्य यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अजिंक्य यांच्या उजव्या डोळ्याखाली आणि नाकाला किरकोळ दुखापत झाली. हा सर्व प्रकार अजिंक्य यांच्या आई-वडीलांसमोर घडला.

या प्रकरणी अजिंक्य फिरोदिया यांच्या तक्रारीवरून अपर्णा फिरोदिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.