Pimpri : …. ही आहेत पाणी टंचाई निर्माण होण्याची कारणे !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी पवना धरणातून 6.55 टीएमसी इतके पाणी आरक्षित आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 17 लाख 30 हजार लोकसंख्येला शहराचा पाण्याचा मापदंड 135 लिटर प्रति माणशी प्रतिदिन याप्रमाणे ठरविण्यात आला. मात्र, शहराची लोकसंख्या सध्या 26 लाखाच्या पुढे पोहोचली आहे. सन 2014-15 पासून नव्याने नळजोड दिलेल्या ग्राहकांची संख्या सुमारे 10 हजार इतकी वाढून सदनिकांची संख्या 90 हजार इतकी वाढली आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होत असून, भविष्यात पाणीपुरवठा अपुरा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पवना नदीतून पाणी बंद पाईपलाईनद्वारे निगडी – सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. येथील चार जलशुद्धीकरण केंद्रामध्ये या पाण्यावर प्रक्रीया केली जाते. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी शहरातील विविध टाक्यांमधून बंद पाईपलाईनद्वारे पुरविले जाते. शहरात प्रति व्यक्ती प्रति दिवस 150 लिटर पाण्याची गरज भासते. रावेत बंधा-यातून शहरातील निवासी विभागासाठी प्रतिदिन सरासरी 485 दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते.

एमआयडीसीकडून प्रतिदिन सरासरी 30 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिका हद्दीतील प्रस्तावित साठवण टाक्या आणि मुख्य जलवाहिन्यांचे सन 2021 ते सन 2030 या दहा वर्षांकरिता नियोजन करण्यात आले आहे. शहराचे एकूण क्षेत्र 181 चौरस किलोमीटर एवढे आहे.

पाण्याची नागरिकांची गरज लक्षात घेऊन तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार 2021 साली शहराच्या 36 लाख 84 हजार लोकसंख्येला प्रति व्यक्ती प्रति दिवस 150 लिटर याप्रमाणे प्रति दिवस 717 दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. गेल्या काही वर्षात शहराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. याचे परिणाम आत्तापासूनच जाणवत आहेत. पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.