पिंपरी-चिंचवडसाठी भाजपचा जाहीरनामा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित

भोसरीचे आमदार महेश लांडगे अनुपस्थित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर ‘वायफाय’ करणे, उत्तम आरोग्य सुविधा आणि सर्वांसाठी 3 लाखांचा आरोग्य विमा तसेच हिंजवडी ते चाकण मेट्रो सुरू करणार अशा विविध आश्वासनांनी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) पिंपरीत करण्यात आले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्रदेश सदस्या उमा खापरे,  माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष रवी लांडगे, सरचिटणीस प्रमोद निसाळ, बाबू नायर, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. अनधिकृत बांधकामे अधिकृत करू या पारंपारिक आश्वासनांबरोबरच अनेक आश्वासने पिंपरी-चिंचवडकरांना दिली आहेत.

जाहीरनाम्यातील मुद्दे –

# इस्त्राईल देशाच्या धर्तीवर शाळा उभारणे
# सरकारी अभियांत्रिकी, वैद्यकीय व नामांकित महाविद्यालये सुरू करणार
# रस्त्यांचे सुयोग्य नियोजन करून महत्वाचे चौक सिग्नल फ्री करणार
# हिंजवडी आयटीपार्ककडे जाणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार
# हिंजवडी ते चाकण मेट्रो सुरू करणार
# शहरातील सर्व हाऊसिंग सोसायट्यांना पुरेसा पाणीपुरवठा करणार
# अनधिकृत बांधकामे सोडविणार
# मिळकतकराची आकारणी चटई क्षेत्रानुसार करणार
# प्राधिकरणातील घरे फ्री होल्ड (नावावर) करणे
# पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी धारकांना व आर्थिक दुर्बलांसाठी घरे बांधणार
#शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय उभारणार
# शासकीय कार्यालये व त्यांची उप कार्यालये पिंपरी-चिंचवड शहरात उभारणार
# शहरात रस्त्यांच्या कडेला सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणार
# शहरात पार्किंग व्यवस्था सुधारणार व आठवडे बाजार सुरू करणार
# सुसज्ज भाजी मंडई उभारणे
# कचरा व्यवस्थापनात आमूलाग्र बदल करणे
# विविध जाती व धर्माच्या स्मशानभूमीसाठी व दफनभूमीच्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा पुरविणार
# सांडपाण्याचा पुन:वापर करून त्यातून वीजनिर्मिती
#सारथीचे पुनरुज्जीवन करणे, महापालिकेच्या सेवा ऑनलाईन करणार
# विविध जाती व धर्माच्या नागरिकांसाठी सांस्कृतिक हॉलसाठी जागा आरक्षित करणार
#शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये सांस्कृतिक कलामंच उभारणार
# सुनियोजित पार्किंग व्यवस्था
# नद्यांचे संवर्धन, सुशोभिकरण करणे व जलपर्यटन केंद्र उभारणार
# महापालिकेची नोकर भरती पारदर्शी करणार
# महिला सक्षमीकरण
# ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणार

दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे हे अनुपस्थित होते. तसेच लांडगे यांनी कालच भोसरी मतदार संघासाठी  स्वतंत्र  ‘निर्धारनामा’ जाहीर केला आहे. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू होती. याबाबत पालकमंत्री बापट यांना विचारले असता ते म्हणाले, शहराच्या तिनही मतदार संघासाठी स्वतंत्र जाहीरनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.