कार्ला गावातील युवकाचा कडधे गावात खून; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – लोणावळ्यामधील कार्ला गावातील एका 25 वर्षीय युवकाचा पवनानगर जवळील कडधे गावात डोक्यावर जबर मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या घटनेतील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही समोर आले आहे. पवनानगर परिसरातील पवना रेस्ट हाऊस जवळ या युवकाचा मृतदेह मिळून आल्यावर काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घटना उघडकीस आली.  

दिनेश बाळू हुलावळे (वय 25, रा. कार्ला, ता. मावळ), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी विशाल राम हुलावळे (रा. कडदे, पवनानगर) यांच्या फिर्यादीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश हा शनिवारी (दि. 11) त्यांच्या कुटुंबियासह कडदे, पवनानगर येथे मामाच्या गावाला ऊरुसाला गेला होता. तेथून तो बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी कामशेत पोलीस ठाण्यात (दि. 14) दिली होती. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना काल शुक्रवारी सायंकाळी पवनानगर रेस्ट हाऊस येथे दिनेशचा मृतदेह मिळून आला. कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या डोक्यात डाव्या भुवईच्या वर गंभीर दुखापत करून खून केला आहे. तसेच त्याची गाडी पुरून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.