मावळात काँग्रेसचा शिवसेनेच्या चार उमेदवारांना अधिकृत जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात काँग्रेस आय पक्षाने अधिकृत पत्रक काढत शिवसेनेच्या कुसगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सत्यभामा शांताराम गाडे, कुसगाव पंचायत समितीच्या उमेदवार उषा संजय घोंगे, वाकसई पंचायत समितीचे सदस्य बाबू शेळके, चांदखेड पंचायत समितीच्या उमेदवार मनिषा आनंदा मालेकर (केदारी) यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे काँग्रेस आयचे मावळ तालुका कार्याध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे व भरत दळवी यांच्या सदर पाठिंबा पत्रकावर स्वाक्षर्‍या आहेत. काँग्रेस  पक्षाची कुसगाव जिल्हा परिषद गटात व चांदखेड पंचायत समिती गणात चांगली ताकद आहे. ही ताकद शिवसेनेच्या मागे पुर्ण क्षमतेने उभी करून शिवसेना उमेदवार निवडून देण्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे. या बदल्यात काही जागांवर शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचा अंतर्गत समझोता झाला आहे. 

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरांची मोट बांधत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांनी समांतर राष्ट्रवादी पक्ष तयार करत राष्ट्रवादी समोर आव्हान निर्माण केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देत भाजपाची कोंडी करण्याची तयारी केली आहे. मतदानाकरिता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला असताना मावळात राष्ट्रवादी व भाजपा या दोन्ही पक्षांना रोखण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.