पिंपरी-चिंचवडमध्ये विकासाच्या बाजूने कौल की सत्ता परिवर्तन?

मतदारराजाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष


एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी  काँग्रेसच्या ताब्यातील पिंपरी-चिंचवड  महापालिका  खेचून आणण्यासाठी  भाजपने कंबर कसली आहे. यंदा प्रथमच भाजपने राष्ट्रवादीसमोर कडवे आव्हान निर्माण केले असल्याचे चित्र  आहे. तर, सत्ताधारी राष्ट्रवादीनेही  हॅटट्रिक करण्यासाठी जोर लावला असून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काटे की टक्कर होणार आहे. त्यामुळे पिंपरी -चिंचवडकर विकासाच्या बाजूने कौल देणार की सत्ता परिवर्तन घडवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्रिशंकू सभागृह अस्तित्वात आले तर आपोआप हातात सत्तेच्या चाव्या येतील, या आशेवर शिवसेना नेते आहेत.

             
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब  दानवे यांच्यासह राज्याच्या मंत्री मंडळातील मंत्र्यानी भाजपच्या उमेदवारांसाठी  सभा घेऊन वातावरणनिर्मिती केली. तर, राष्ट्रवादीकडून  शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, नवाब मलिक यांनी जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यंदा शिवसेनेही चांगलाच जोर लावला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,  पर्यावरणमंत्री रामदास कदम , संपर्क प्रमुख अमोल कोल्हे यांनी सभा घेतल्या असून खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार यांनीही जोर लावला आहे.  

 पिंपरी-चिंचवड महापालिकेवर गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादीने शहराचा विकासही केला  आहे. विकासाच्या जोरावर   हॅटट्रिक करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर भाजपने  पिंपरी-चिंचवड महापालिका काबीज करण्यासाठी अनेक प्रयत्न चालविलआहेत. राष्ट्रवादीतील बडे मोहरे पक्षात घेतले. एकेकाळी अजित पवारांचे उजवे  हात म्हणून ओळख असलेले लक्ष्मण जगताप यांना भाजपमध्ये घेतले. शहर भाजपची धुराही त्यांच्याकडे दिली. त्यानंतर भोसरी मतदार संघातून अपक्ष  निवडून आलेल्या  आमदार महेश  लांडगे यांनीही भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. लांडगे यांनी आपले राजकीय गुरु  आणि शहरातील बडे  नेते माजी महापौर आझम पानसरे यांना भाजपमध्ये आणले. या नेत्यांनी राष्ट्रवादीतील आपल्या समर्थकांना भाजपमध्ये घेतले आहे. त्यानंतर शहरातील राजकीय गणिते बदलली गेली. कधी नव्हे ते पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीसमोर कडवे आव्हान निर्माण केल्याचे चित्र आहे. 

अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, रोडझोन, शास्तीकर आणि महापालिकेतील भ्रष्टाचार या मुद्यावर यंदा प्रचारात भर राहीला आहे. राष्ट्रवादीने विकासकामाच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. तसेच बफरझोन, शास्तीकराचा प्रश्न, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न प्रलंबित ठेवल्याचा आरोपही केला. शेवटच्या क्षणी शास्तीकराचा प्रश्न सुटल्याचेही भाजपच्या नेत्यांनी सांगितले. तर, राष्ट्रवादीनेही भाजपला जशाच तसे प्रत्युत्तर देऊन राष्ट्रवादीने शहराचा कायापालट केला असल्याचे जनतेला सांगितले. तसेच भाजपने केंद्रात व राज्यात सरकार असूनही दोन वर्षात शहराला काहीच दिले नाही, या मुद्यावर राष्ट्रवादीने भर दिला होता. 

2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे  83 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेचे 14, भाजपचे तीन,  मनसेचे चार, अपक्ष नऊ आणि रिपब्लिकन पार्टी आठवले गट एक नगरसेवक निवडून आला होता. यंदा सगळेच  पक्ष स्वबळावर लढले आहेत. त्यामुळे मतांची विभागणी होणार आहे.  मतांची विभागणी कोणाच्या पथ्यावर पडते  हेही महत्वाचे ठरणार आहे. 

पहिल्याच वेळी चार नगरसेवक निवडून आलेल्या मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे 14 नगरसेवक निवडून आले होते. यंदा शिवसेनेची शहरात ताकद वाढल्याचे चित्र आहे. दोन खासदार, एक आमदार शिवसेनेचा आहे. काँग्रेसचे 14  नगरसेवक होते. त्यापैकी 13 जणांनी पक्षांतर केले आहे. यंदा काँग्रेसचा  एकही विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या आखाड्यात नाही. त्यामुळे काँग्रेसचे किती  नगरसेवक निवडून येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

प्रचाराची रणधुमाळी थंडावली आहे. खरी कसोटी आहे ती मतदारांची. प्रचाराच्या या सर्व धामधुमीत सर्वच राजकीय पक्षांनी आपआपली भूमिका त्यांच्यासमोर ठेवली आहे. यापैकी कुणाला सत्तेत बसवायचे आणि कुणाला नाही याचा सर्वस्वी निर्णय मतदारराजावर अवलंबून आहे. उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होण्यास काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकर  विकासाच्या बाजूने कौल देणार की सत्ता परिवर्तन घडविणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.