जम्मू काश्मीरविना देश अपूर्ण – जयराम रमेश

एमपीसी न्यूज – जम्मू आणि काश्मीरमध्ये तेथील नागरिकांसाठी योजना सुरू करण्यात आल्या. त्याबरोबरच पर्यटन या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल. तेथे पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. जम्मू कश्मीरविना देश अपूर्ण आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केले.
सरहद संस्थेतर्फे आयोजित केलेल्या काश्मीर फेस्टिवलचे उद्घाटन रमेश यांच्या हस्ते झाले. यावेळी जम्मू काश्मीरचे पर्यटन विभागाचे संचालक मेहमूद शाह, मोहम्मद हसन मीर, सरहदचे संजय नहार आदी उपस्थित होते.
जयराम रमेश म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षी 13 लाख पर्यटक गेल्याची माहिती मिळाली. तेथे अनेक नवीन योजना आणल्या गेल्या. 8 आणि 10 वी नापास आणि शाळा सुटलेल्या मुलांसाठी प्रशिक्षण आणि रोजगारासाठी हिमायत नावाची योजना राबविण्यात आली. त्यानंतर उडाण आणि उम्मीद या दोन योजना तरुणांसाठी आणि महिलांसाठी आणल्या गेल्या. या योजनांमधून आणि पर्यटनाच्या माध्यमातून जम्मू काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल. जम्मू कश्मीरची संस्कृती ही वेगळी नाही. त्यामुळे जम्मू कश्मीरविना आपण अपूर्ण असून देशही त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे.
मेहमूद शाह म्हणाले की, पुण्याने आमच्याकडील मुलांना सन्मान दिला. त्यातून परस्पर संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे. तेथील वातावरण तणावपूर्ण झाल्यास येथील नागरिकही व्यथित होतात. पुण्यात आम्हाला घरच्यासारखे वातावरण असल्यासारखे वाटते.
संजय नहार म्हणाले की, जम्मू कश्मीरचे पुण्याशी जवळचे नाते असल्याने पुण्यात काश्मीर फेस्टिव्हल सुरू केले. त्यांच्याशी आपल्याला जोडून घ्यायचे असेल तर कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्याला दोन पावले पुढे टाकावी लागणार. ही चळवळ सर्वांची आहे.