संयोगिता घोरपडे हिला वरिष्ठ दुहेरी मानांकन स्पर्धेत उपविजेतेपद !

एमपीसी न्यूज – निखिल कानेटकर बॅडमिंटन अॅकॅडमी (एनकेबीए) ची बॅडमिंटनपटू संयोगिता घोरपडे हिने कर्नाटक येथे झालेल्या अखिल भारतीय वरिष्ठ दुहेरी मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले.
कर्नाटक येथील दावंगेरेमध्ये ही स्पर्धा झाली. संयोगिताने मोठ्या दुखापतीमधून सावरत नुकतेच बिहारमधील पाटणा येथे नुकत्याच झालेल्या 81 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. या उपविजेतेपदानंतर या स्पर्धेतही तिने अंतिम सामन्यापर्यंत मुसंडी मारली.
या स्पर्धेत संयोगिताने राष्ट्रीय रौप्यपदक विजेती धान्या नायर हिच्या साथीत खेळताना अंतिम फेरीत प्रवेश केला. पण अॅग्ना अॅन्टो आणि स्नेहा संथीलाल (केरळ) यांच्या विरुद्ध संयोगिता आणि धान्याला 24-22, 21-19 असा पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीतील संयोगिताचा हा सलग दुसरा पराभव ठरला. केरळच्या अॅग्ना आणि स्नेही केरळ राज्य विजेती जोडी आहे.
अंतिम फेरीआधी संयोगिता आणि धान्या या बिगरमानांकित जोडीने सनसनाटी खेळ करून अनपेक्षित निकाल नोंदविले होते. पहिल्या फेरीमध्ये संयोगिता आणि जोडीने महाराष्ट्राच्या रिया अरोलकर व पूजा देवलेकर यांचा 21-17, 21-19, असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी निम्मी पटेल आणि सारूनी शर्मा यांचा 21-16, 21-16 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
उपांत्य फेरीत सनसनाटी निकाल नोंदविताना त्यांनी दुसर्या मानांकित अनुरा प्रभू देसाई आणि करिष्मा वाडकर यांचा 21-14, 21-18 असा पराभव केला.
दुखापतीमधून सावरून खेळणार्या संयोगिताने आत्तापर्यंत 8 सामने जिंकले असून केवळ दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. हे दोन्ही सामने अंतिम फेरीचे होते.