जगण्यातून सहज उमलते ती कविता प्रभावी – डॉ. मनोहर जाधव

‘मसाप’चा कुसुमाग्रज पुरस्कार विष्णू थोरे यांना प्रदान

एमपीसी न्यूज – निमशहरीकरणामुळे खेड्यापाड्यात शेतीमातीच्या आणि कुटुंबव्यवस्थेमध्ये अनेक समस्या आणि आव्हाने उभी आहेत. त्या जगण्यामधले आंतरिक द्वंद्व आणि विरोधाभास, संवेदनशीलतेने टिपून स्वतंत्र जगणं शब्दबद्ध करणारी आजची समकालीन कविता अस्वस्थ करते. ‘आपल्या जगण्यातून भोगण्यातून सहज उमलते तीच कविता शब्दातून प्रभावीपणे उमटते’, असे मत साहित्यिक आणि समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुरस्कृत कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार कवी विष्णू थोरे आणि प्रकाशक अक्षरबंध प्रकाशनाचे प्रवीण जोंधळे याना डॉ. मनोहर जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.


.
जाधव म्हणाले की, ‘आपल्या जगण्यातून भोगण्यातून सहज उमलते तीच कविता शब्दातून प्रभावीपणे उमटते आणि तीच कविता सशक्तपणे आशय प्रकट करते, तेव्हा ती वाचकाला अस्वस्थ करून सोडते.’

प्रा. जोशी म्हणाले की, ‘जागतिकीकरणानंतरच्या खेडयांचे तुटलेपण थोरे यांनी कवितेतून प्रभावीपणे मांडले आहे. विस्कटत चाललेल्या समाजाच्या सर्व पातळीवरच्या कोसळणीच्या कहाण्या त्यांच्या कवितेत भरून उरल्या आहेत. थोरे यांची कविता अंधाराच्या जागा दाखविणारी असली तरी ती निराशेचा सूर आळवत नाही. अंतर्नाद जपणारी ही आश्वासक कविता आहे.

‘कवी कुसुमाग्रजांची नाममुद्रा असलेला हा मानाचा पुरस्कार पुढील वाटचालीत साहित्यलेखनासाठी अधिक प्रोत्साहन आणि बळ देणारा आहे’, असे कवी विष्णू थोरे यांनी सांगितले. कार्यवाह बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.