उद्धवराव, तुम्ही शेखचिल्ली ‘होऊन दाखवलं’!

आण्णा खटावकर


मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण दीर्घ काळ चालत राहील. पण या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे झाले तर ते असं करावं लागेल, उद्धवराव, तुम्ही शेखचिल्ली ‘होऊन दाखवलं’!

‘हे करून दाखवलं, ते करून दाखवलं’, असं सांगण्याच्या नादात उद्धवराव ठाकरे यांनी शेखचिल्ली कसे व्हावे याचा एकपात्री प्रयोग सादर केला. प्रॉम्प्टर म्हणून सच्चाईकार आणि अग्रलेखांचे नव्हे तर मॅरेथॉन मुलाखतीचे बादशाह संजयराव राऊत विंगेत उभे होते. (विंगेत उभे राहून ते शाहिस्तेखानाची बोटे कशी छाटायची याचा पेन हातात घेऊन सराव करत होते) कोणतेही कारण नसताना युद्धात मीच स्वबळावर जिंकणार, अशी तुतारी वाजवलेल्या उद्धवराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आता आम्हीच एक नंबर आहोत, याचा आनंद साजरा करावा लागतोय. बिच्चारे उद्धवराव! एखाद्या  विद्यार्थ्याने परीक्षेच्या आधीपासून मीच बोर्डात पहिला येणार असे जगभर सांगत हिंडावे आणि निकालानंतर पहिल्या वर्गात आल्याचा उत्सव साजरा करावा असा हा प्रकार झाला.

मुंबई महापालिकेत शिवसेनाच सर्वाधिक जागा जिंकणार हे भाकीत  वर्तवण्यासाठी भविष्यवेत्याची गरज नव्हती. उद्धवरावांनी अकारण मुंबईची लढत प्रतिष्ठेची करून ठेवली आणि आपली शोभा करून घेतली.    ”विजयसभेचे आत्ताच मोदींना निमंत्रण देऊन टाकतो’ अशी डरकाळी अनेक सभांमध्ये फोडणाऱ्या उद्धवरावांना बहुमताचा आकडा गोळा कारण्यासाठी धावपळ करावी लागतेय. (कदाचित काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्याने सेनेचा महापौर होईलही) घासून नाही ठासून येणार, विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार, असे गावभर सांगत हिंडणाऱ्या उद्धवरावांवर पक्षातून हकालपट्टी केलेल्या बंडखोरांना पक्षात येण्यासाठी सांगावा धाडावा लागतोय. ही स्थिती पाहिल्यावर उद्धवरावांनी शेखचिल्ली होऊन दाखवलं असं म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही. उद्धवरावांनी हात दाखवून अवलक्षण का केलं, याचं उत्तर काही केल्या मिळत नाही.

गेल्या महिन्याभरातील घडामोडी पाहिल्यावर उद्धवरावांना आपण आक्रमक होऊन क्रिझ बाहेर पडावं की क्रिझमध्ये राहूनच खेळावं याचा निर्णय घेता येत नव्हता, असे वाटते. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर उद्धवराव ‘हाफ कॉक’ खेळले. ‘हाफ कॉक’ खेळल्यामुळे ‘मी-मी’ म्हणणारे फलंदाज बाद होतात. उद्धवरावांना क्रिझ बाहेर न येताच षटकार ठोकायचा होता . त्या नादात ते एवढे स्टंपच्या जवळ गेले की त्यांची हिट विकेट पडता पडता राहिली.

उद्धवरावांना आपण महाराष्ट्राचे नितीश कुमार किंवा अरविंद केजरीवाल होऊ, अशी स्वप्ने पडू लागली असावीत. मुंबई महापालिकेत स्वबळावर बहुमत मिळवायचे आणि फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घ्यायचा. पाठिंबा काढून घेतल्यावर लगेच निवडणुका होतील, नोटबंदीमुळे अप्रिय झालेल्या भाजपला सोडून मतदार आपल्यालाच पसंत करतील आणि आपण वाजत गाजत "वर्षा" ला वरमाला घालू या स्वप्नात उद्धवराव गुंग झाले होते, मात्र मतदारांनी त्यांना दणकन जमिनीवर आणले आहे. त्यामुळे त्यांनी आपण सत्तेबाहेर पडणार असल्याची हवा तयार केली. मतदानापूर्वी राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्यांनी प्रत्यक्षात मात्र ते खिशातच उबवले. अर्थात ते हुकमाचे ताबेदार! उद्धवरावांनी त्यांना राजीनामे बाहेर काढण्याची परवानगीच दिली नाही. यालाच मी ‘हाफ कॉक’ खेळणे म्हणतो. आता निकालामुळे ‘कुणाची ठासली, कुणाची फाटली’ ही जगासमोर आलेच आहे.

नोटबंदीमुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे, त्यामुळे मुंबईतील मतदार आपल्याला सव्वाशे जागा मिळवून देईल असा विश्वास उद्धवराव आणि त्यांच्या सल्लागारांना वाटत होता. स्वतःच्या ताकदीवर राज्य काबीज करण्याची उद्धवरावांची महत्वाकांक्षा गैर आहे, असे कोणीच म्हणणार नाही. महत्वाकांक्षा असल्याशिवाय राजकारणात सोडा पण व्यक्तिगत आयुष्यात काहीच सध्य करता येत नाही. मात्र या महत्वकांक्षेपोटी केव्हा आक्रमक व्हायचे, याचा अचूक निर्णय घेण्याचे राजकीय आकलन असले पाहिजे.

नितीश कुमारांनी पंतप्रधानसाठीचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजप बरोबरची अनेक वर्षांची युती तोडून टाकली. भाजप बरोबरची युती तोडून टाकल्यास आपले सरकार कोसळू शकते याची पर्वा न करता नितीश कुमारांनी हे धाडस दाखवले. आपली खेळी चुकल्यावर खालमानेने भाजपकडे जाण्याऐवजी त्यांनी लालू प्रसादांसारख्या कट्टर विरोधकांशी हात मिळवणी करणे पसंत केले. तरीही मतदारांनी नितीश कुमारांना निवडून दिले, याचे कारण बिहारमध्ये त्यांनी खरोखरच विकास करून दाखविला होता. बिहारच्या जनतेने देशाचा कारभारी म्हणून मोदींना आणि राज्याचा कारभारी म्हणून नितीश कुमारांना निवडले. नितीश कुमारांची प्रतिमा स्वच्छ होती म्हणूनच मतदारांनी राज्यापुरता त्यांचा पर्याय निवडला होता. याच नितीश कुमारांनी मोदींशी असलेले टोकाचे मतभेद विसरून नोटबंदीच्या निर्णयाला मोकळेपणाने पाठिंबा दिला आणि उद्धवराव नोटबंदीवरून भाजपविरोधात हिस्टेरिक झाल्यासारखे  बोंबा ठोकत बसले आहेत.  उद्धवरावांना महाराष्ट्राचा नितीश कुमार कधीच बनता येणार नव्हतं.

मुंबई महापालिकेचा अनेक वर्षे कारभारी असूनही त्यांना दाखविण्यासारख काय होतं? राज्यातल्या मतदारांना उद्धवराव मुंबईतले खड्डे दाखविणार होते का? भाजप विरोधात नेमकी कोणती भूमिका घायची या विषयी संभ्रमात असलेले उद्धवराव म्हणूनच शेखचिल्ली होऊन बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत असभ्य भाषेत टीका करून उद्धवरावांनी प्रचाराची पातळी कमालीची खाली नेली. धड ना सत्तेत, ना विरोधात, अशी अवस्था स्वतःच बनवून टाकलेले उद्धवराव यापुढील काळात राजकीय शहाणपणा दाखवतील, अशी आशा करणे व्यर्थ आहे. या अवस्थेला उद्धवराव स्वतः आणि त्यांचे स्वयंघोषित चाणक्य रा. रा. संजयराव राऊत हेच जबाबदार आहेत. मुंबईच्या छोट्या लढाईला विनाकारण महायुद्धाचे स्वरूप आणून त्यांनी स्वत:चे हसे करून घेतले आहे.

भाजपने 80-90 पर्यंत जागा घेण्याचा पर्याय दिला होता. त्यावेळी झाकली मूठ ठेवत हा प्रस्ताव स्वीकारला असता तर आज ही वेळ आली नसती. पण त्यावेळी स्वबळावर बहुमत मिळवण्याच्या ईर्षेने उद्धवराव पेटून उठले होते. सेनेला 84 जागा आणि भाजपला 82 जागा म्हणजे शिवसेनेचा पराभवच आहे. तो मान्य करायचा उदारपणाही यांच्या अंगी नाही. त्यामुळेच सत्ता, संपत्तीचा वापर करून यश मिळवले, असं भोकाड उद्धवरावांनी पसरले आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळालेले पाहून मुंबई आपल्या हातून निसटेल की काय, या भयगंडाने उद्धवराव अस्वस्थ झाले असावेत आणि त्यांनी त्यांच्या दृष्टीने निर्णायक लढाईची तयारी सुरु केली असावी.

 

घाबरगुंडी उडालेल्या उद्धवरावांनी मग आक्रमकतेचा आव आणत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अत्यंत असभ्य भाषेत टीका सुरु केली.  यांच्याकडे सांगण्यासारखे काही नव्हतेच. त्यामुळे नोटबंदीच्या नावानं थयथयाट सुरु झाला. मुंबईतील सत्ता जाऊ शकते या भीतीने उद्धवराव एवढे घाबरले होते की त्यांनी मुंबईबाहेर फक्त दोनदाच (नाशिक आणि पुणे) पाऊल टाकले. तिथेही यांचा बोऱ्या वाजला. मुंबईत गल्लीबोळात सभा घेत बसल्याने उद्धवराव महापालिकेची सत्ता टिकवण्यासाठी हतबल झाले आहेत, असेच चित्र तयार झाले. मुख्यमंत्री फडणवीस सभांमधून मुंबईच्या विकासकामांवर बोलत होते आणि हे महाशय पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आपण किती तोल गमावला आहे, याचे दर्शन घडवत होते. 25 वर्षे आम्ही युतीत सडलो असे म्हणताना, आपण आपल्या परमपूज्य वडिलांच्या निर्णयाला चुकीचे ठरवत आहोत, याचेही भान यांना नव्हते. याचा परिणाम व्हायचा तो झालाच. आता काय करणार उद्धवराव तुम्ही? बोला ना?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.