संगीत कर्मयोगी महामहोपाध्याय पं. स. भ. देशपांडे जन्मशताब्दी वर्षा निमित्त शिष्यवृंदांची आदरांजली

एमपीसी न्यूज – संगीत कर्मयोगी महामहोपाध्याय पं. स. भ. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यात त्यांच्या शिष्यवृंदांनी त्यांना सांगितिक आदरांजली देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने शास्त्रीय संगीत अभ्यासक, तज्ज्ञ आणि शास्त्रीय संगीत शिकवणा-यांना पंडितजींनी रचलेल्या अवीट बंदीशी ऐकायला मिळणार आहेत.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे उध्वर्यू पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर आणि पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्या ग्वाल्हेर घराण्याचा सांगितिक वारसा तितक्याच ताकदीने पुढे नेणारे महामहोपाध्याय पं. स. भ. देशपांडे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची वाटचाल आणि मंडळाच्या कार्यात पंडितजींचे मोलाचे योगदान होते. शास्त्रीय गायक, रचनाकार, संगीतविषयक विपूल लेखन करणारे अभ्यासू लेखक, शिक्षक आणि आदर्श गुरू असण्या बरोबरच उत्तम माणूस म्हणूनही पंडितजी खूप महान होते.

पं. स. भ. देशपांडे यांचे शिक्षण बी.ए., बी. एड., संगीत प्रवीणपर्यंत झाले. ज्येष्ठ बंधू पं. सदाशिवराव देशपांडे, जबलपूरचे गोविंदरावगुरुजी आणि सुप्रसिद्ध गायक पद्‌भूषण प. विनायकरावजी पटवर्धन त्यांना गुरू म्हणून लाभले. 1951मध्ये पंडितजींनी हैद्राबाद येथे विवेकवर्धिनी संगीत विद्यालयाची स्थापना केली. तिथूनच त्यांच्या संगीतविषयक कार्याचा श्रीगणेशा झाला. 25 वर्षे त्यांनी विद्यालयाचे प्राचार्यपद भूषवले. या काळात त्यांनी ‘मुक्तद्वार कलाकेंद्र’ स्थापून शास्त्रीय संगीत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी ख-या अर्थाने ज्ञानाचे महाद्वार उघडले.

मुक्तद्वार कलाकेंद्राच्या अंतर्गत अनेक नवोदित त्याचप्रमाणे प्रथितयश कलाकारांसाठी एक उत्तम व्यासपीठ निर्माण केले. त्याचप्रमाणे जवळजवळ 12 वर्षे त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या सचिवपदाचा कार्यभार सांभाळला. गांधर्व मंडळाच्या मिरज येथील गुरुकुल विभागासाठीही त्यांनी 4 वर्षे प्रचार्यपद भुषविले. अनेक शिक्षक परिषदा त्याचप्रमाणे संगीत संमेलनाचे आयोजनही त्यांनी केले. त्यांनी आयोजिलेले 1967 सालचे हैद्राबाद संगीत संमेलन विशेष उल्लेखनिय ठरले.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे त्यांना 2 वर्षांसाठी फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. ग्वाल्हेर घराण्याची गायकी असलेल्या पंडितजींचे लयकारीवर विलक्षण प्रभुत्व होते. ख्यालगायनात सुद्धा प्रत्येक हा भावपूर्ण असलाच पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. रागरस निर्मिती सिद्धांतावर त्यांचे विशेष प्रेम. अनेक मानाच्या महोत्सवांमधून पंडितजींनी गाणे सादर केले होते. फक्त देशालाच नाही तर परदेशातसुद्धा आपल्या गायकीने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. संगीताच्या प्रचारासाठी संगीतातल्या विविध पैलुंवर ते सप्रयोग व्याख्याने देत. अनेक शिबिरांमधून संगीताच्या विद्यार्थ्यांना संगीतातील विविध गोष्टींबाबत मार्गदर्शन करत.

मार्गदर्शन करत असताना रागांमधील सौंदर्यस्थळ उलगडून दाखवण्यात त्यांचे कसब होते. गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणा-या सर्व परिक्षांसाठी परिक्षार्थी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. महाराष्ट्र राज्य आणि इतरही राज्यांमधल्या अनेक विश्व विद्यालयांमध्ये घेतल्या जाणा-या एम. ए. संगीत परीक्षांसाठी त्यांनी अनेक वर्ष परीक्षक आणि पेपर सेटर म्हणून काम केले. पंडितजी आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ‘अ’ श्रेणी कलाकार होते. अनेक मराठी नाटकांमधून संगीत नैपुण्यासोबतच त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाचे दर्शन रसिकांना घडवले होते. संगीत क्षेत्रातल्या त्यांच्या अनमोल योगदानाबद्दल 1995 मध्ये बेळगाव संगीत महोत्सवात त्यांना ‘संगीत महामहोपाध्याय’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले.

संगीत क्षेत्रातील कर्मयोगी असण्याबरोबरच पंडितजींच्या नितळ माणुसपणाचे ते शेवटपर्यंत ते ख-या अर्थाने महान राहिले. त्यांनी त्यांचे विद्यार्थी आणि शिष्यांवर आपत्याप्रमाणे प्रेम केले प्रत्येक विद्यार्थ्यांत, शिष्यात कुठला ना कुठला गुण असतोच आणि तो हेरून पारखून ते विद्यार्थ्यांमधले ते बलस्थान अजून बळकट करण्याचा प्रयत्न करत. शिष्यांना शिकवत असताना ते ते जसे म्हणतात अगदी तसेच विद्यार्थ्यांनी म्हणू नये उलट त्यांच्यातल्या प्रतिभेला, कल्पनाशक्तीला चालना मिळावी. अशा पद्धतीने ते प्रत्येक शिष्याच्या क्षमतेनुसार शिकत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्यांनी पीएचडी संपादन केली होती. आश्चर्य म्हणजे शेवटपर्यंत 2012 पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ते तासाला अवधे 10 किंवा 15 रुपये घ्यायचे. आपल्या प्रत्येक शिष्याला तितक्याच तळमळीने, आत्मियतने शिकवणारा पंडितजींसारखा गुरू विरळाच.

कलाकाराचे मन निर्मळ असले पाहिजे. त्याशिवाय तो उत्तम कलाकार होऊच शकत नाही असे ते नेहमी म्हणत. वेळेच्या बाबतीत ते फारच काटेकोर होते. वेळेचे व्यवस्थापन ज्याला जमते तोच आयुष्यात यशस्वी होतो. हे तत्व यांनी आयुष्यभर पाळले आणि आपल्या शिष्यांवरही बिंबवले. ते स्वतः गानतपस्वी होते. पण कोणत्याही वयाच्या अगदी संगीतात छोटा असलेला कलाकार आणि साथीदाराला पण ते अत्यंत सन्मानाने वागवत. माझे विद्यार्थी लाख मोलाचे आहेत. त्यामुळे मी तसा लखपती आहे, असे म्हणाणारे निगर्वी, निरहंकारी, मृदु भाषी, आयुष्यभर कधीच कोणाचाही मत्सर न केलेले. प्रत्येक व्यक्तीमधील फक्त सकारात्मक बाजूच बघणारे पंडित स.भ. देशपांडे ख-या अर्थाने पितृतुल्य होते. त्यांच्या सारखे गुरु लाभणे म्हणजे आयुष्य सार्थकी लावण्यासारखे आहे, अशी भावना त्यांच्या प्रत्येक शिष्याच्या मनात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.