आरटीई प्रवेशाबाबत लॉटरी पद्धतीच्या पहिल्याच टप्प्याला विलंब

एमपीसी न्यूज –  शिक्षण अधिकार 2009 अधिनियमाच्या (आरटीई) अतंर्गत नोंदणीकृत खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या 25 टक्के प्रवेशासाठी 27 व 28 फेब्रुवारीला प्रवेशाचा लॉटरी पद्धतीने पहिला टप्पा पार पडणार होता. मात्र, आज (दि. 3) मार्चपर्यंत लॉटरी पद्धतीचा पहिला टप्पा घेण्यात आलेला नाही. लॉटरी पद्धतीच्या पहिल्याच टप्प्याला विलंब होत असून विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशासाठी विलंब होण्याची शक्यता आहे.

याविषयी संबंधित अधिका-यांशी संपर्क साधला असता उद्या किंवा परवा लॉटरी पद्धतीचा टप्पा पार पडेल, असे सांगण्यात आले. यावरुन असे स्पष्ट झाले की, अधिका-यांकडेही याबाबतच्या योग्य तारखा उपलब्ध नाहीत.

हाच प्रकार मागील महिन्यात आरटीई प्रवेशासाठीच्या शाळा नोंदणीबाबतीतही झालेला पाहायला मिळाला. शाळा नोंदणीसाठी 3 फेब्रुवारीपर्यंत कालावधी देण्यात आला होता. मात्र, काही शाळांची नोंदणी न झाल्यामुळे ती तारीख 6 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली होती. याचीही कोणतीही माहिती प्रशासनाकडून पालकांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ऑनलाईन अर्ज उपलब्ध न झाल्यामुळे अनेक पालकांनी नाराजीही व्यक्त केली होती.

राज्यशासनाने दिलेल्या ताराखांप्रमाणे 27 व 28 फेब्रुवारीला प्रवेशाचा लॉटरी पद्धतीने पहिला टप्पा,  14 व 15 मार्चला दुसरा लॉटरी टप्पा 24 ते 25 मार्चला तिसरा टप्पा तर चौथा टप्पा 7 ते 8 एप्रिल आणि शेवटचा व पाचवा लॉटरी टप्पा 18 ते 20 एप्रिल या दोन दिवसात होईल, असे टप्पे पार पडणे अपेक्षित आहे.  मात्र, सध्या होत असलेल्या विलंबामुळे यापुढील प्रक्रिया तरी वेळेत होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.