देशाला गौरव प्राप्त करून देणारे येसूबाईंचे व्यक्तिमत्व अलौकिक – डॉ. सदाशिव शिवदे

एमपीसी न्यूज –  छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यात पत्नी म्हणून एकरुप झालेल्या आणि संभाजी महाराजांच्या हत्येनंतर संयमीपणे उभे राहत देशाला गौरव प्राप्त करून देणारे महाराणी  येसूबाईंचे व्यक्तिमत्व होते. मराठयांच्या इतिहासात अनेक शूर स्त्रिया होऊन गेल्या. परंतु परकीयांच्या कैदेत असताना संयमाने सर्व परिस्थितीला 30 वर्षे तोंड देणा-या त्या एकमेव स्त्री आहेत, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी व्यक्त केले.

 

प्रॉलिफिक पब्लिकेशन जळगावतर्फे साकारलेल्या व सुलभा राजीव लिखित येसूबाई या कादंबरीचे प्रकाशन पत्रकार भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, डॉ.अरुणचंद्र पाठक, डॉ. मनिषा बाठे, प्रकाशक राजीव कुलकर्णी, लेखिका सुलभा राजीव आदी उपस्थित होते.

 

डॉ.सदाशिव शिवदे म्हणाले की, महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील कादंबरी लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. कादंबरी लेखन करताना प्रचंड अभ्यासासह चिंतनाची जोड आवश्यक असते. मनन, चिंतन, चिकित्सा आणि लेखन हे कादंबरी लेखनाचे टप्पे आहेत. त्यासाठी लागणारी उपजत प्रतिभा लेखकाकडे असणे आवश्यक आहे.

 

पांडुरंग बलकवडे म्हणाले, महाराणी येसूबाईंच्या जीवनात अनेक संकटे आली. परंतु संकटांशी धिरोदत्तपणे सामना करीत यशस्वीपणे त्या जीवन जगल्या आणि आपली कर्तव्ये पार पाडली. अत्यंत निराशाजनक परिस्थितीत त्यांनी जीवन व्यतीत केले. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा कार्यकाळ येसूबाईंनी पाहिला होता. दिल्लीत सत्ता काबीज केल्यानंतर मराठयांनी येसूबाईंना स्वगृही सातारा येथे आणले. तो पर्यंतचा जीवनपट इतिहासाला माहित आहे. परंतु साता-यात आल्यानंतर तेथील सतराव्या शतकातील या महापतीव्रतीचे जीवन आणि मृत्यूचा दिनांक देखील इतिहासाला माहित नाही हे दुर्देव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

सुनील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अमेय बाकरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.