दारूबंदी कायद्याने महिलांवरील अन्याय अत्याचार दूर होतील – अण्णा हजारे

एमपीसी न्यूज – नव्या दारूबंदी कायदाने महिलांसह अनेक कुटुंबियांना न्याय मिळणार आहे. यातून महिलांवरील अन्याय अत्याचार दूर होतील. पोलीस दारू बंदी करू शकत नाहीत. आता नव्या कायद्यात ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून दारू बनविणाऱ्यासह  पिणारा आणि दारू धंद्यास मदत करणाऱ्या जागा मालकावर देखील कठोर कारवाईची तरतूद होत आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केले.

 

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शिरूर तालुक्याचे वतीने आबासाहेब महाराज गोडसे  यांच्या मार्गदर्शनातून आयोजित कीर्तन महोत्सव आणि सद्गुरू जोग महाराज जीवन चरित्र कथा सप्ताहाचे काल्याचे कीर्तन सेवेनंतर समाजसेवक आण्णासाहेब हजारे मार्गदर्शन करताना बोलत होते. तत्पूर्वी शांतीभूषण मारुती महाराज कुऱ्हेकर यांनी काल्याची मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून कीर्तन सेवा झाली. यावेळी मुक्ताबाई फडावरील व्यासपीठावर आबासाहेब महाराज गोडसे, नाना महाराज चंदिले, भास्कर महाराज शिंदे आदींसह शिरूर तालुक्यासह वारकरी सांप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, साधक विद्यार्थी, वारकरी, भाविक आणि नागरिक उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना हजारे म्हणाले की, समाज विकासासाठी केलेल्या लढ्यातून आठ कायदे प्रभावी झाले. अनेक भ्रष्ट अधिकारी, पदाधिकारी घरी बसविले. यात माहिती अधिकार, लोकपाल कायदा झाला. आता दारू बंदी कायदा प्रक्रिया सुरू आहे. जीवनात शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग आणि निरपेक्ष सेवाभाव या पंचसुत्रित जीवन प्रवास निश्चित आनंदी होईल. अधोगतीच्या मार्गाने चाललेल्या समाजाला तारण्यासाठी वारकरी सांप्रदायातील संत विचार आचरणात आणण्याची गरज आहे. राळेगणच्या शाळांत बिघडलेल्या मुलांना प्रवेश देऊन त्यांना सुसंस्कारित शिक्षण दिले जात आहे. कीर्तनकारां विषयी बोलताना ते म्हणाले की, तीन ठिकाणी कीर्तनसेवा श्रवणाचा योग आला. मात्र, कीर्तन सेवा सर्वत्र एकच ठांच्याची ऐकली. यात पाठांतराने सेवा होणार नाही. तर आतून सेवा व्हावी. काही लोकांना रात्री झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. जीवनात आनंद घेता यायला हवा, असे त्यांनी सांगितले. शेतात एका दाण्याला गाडून घ्यावे लागते. काही जण आपण का गाडून घ्यायचे, असा विचार करतात. जे दाणे गाडले जात नाही त्याचे गिरणीत पीठ होते.

 

युवा तरुण देश विकासाची राष्ट्रशक्ती असल्याचे सांगत वारकरी टाळकरी यांच्यातील युवक पाहून त्यांनी युवक तरुण संसार करून देखील समाज विकास साधू शकतील. सध्या मी, माझे, तुझे ते ही माझे हे जोपर्यंत संपले जात नाही. तो पर्यंत खरा आनंद मिळणार नाही. मालमत्ता जमिनी जागेवरच राहणार आहेत. आनंदासाठी त्याग केला पाहिजे. मन चंचल आहे, असे सांगून त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की,ज्या प्रमाणे संस्थेची शताब्दी होत आहे. अशीच शताब्दी मारुती महाराज कुऱ्हेकर यांची साजरी व्हावी. कुऱ्हेकर यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. त्यांच्या कार्याचाही हजारे यांनी कौतुक केले. 

 

ह.भ.प.मारुती महाराज कुऱ्हेकर यांनी कीर्तन सेवेत विविध संतांचे साहित्य, संत विचार आणि काल्याचे महत्त्व सांगत सेवा रुजू केली. यावेळी विविध संतांचे कार्य त्यांनी सांगत वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीनिमित्त आयोजित सप्ताहांचे कौतुक केले. वारकरी सांप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य यापुढेही समाजाभिमुख पणे सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.