भाजपा में सुनाई दे रही है, एक थप्पड की गुंज!

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपटांमध्ये आतापर्यंत अनेक थप्पडचे आवाज चांगलेच गाजले आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये अशाच एका थप्पडचा आवाज घुमत असून त्या आवाजाच्या प्रतिध्वनींमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

भाजपच्या एका नवनिर्वाचित नगरसेविकेने अभिनंदन करायला गेलेल्या पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकवण्याची धक्कादायक घटना नुकतीच भोसरी परिसरात घडली. चारचौघांमध्ये शिवीगाळ करीत या नगरसेविकेने वाघिणीचे रूप धारण केले आणि आपल्या मजबूत पंज्याने त्या पदाधिकारी महिलेच्या श्रीमुखात भडकवली. ही थप्पड एवढी जोरदार होती की काही दिवस गालावर वळ कायम होते, असेही म्हणतात. गालावरचे वळ आता गेले असले तरी थपडीचे प्रतिध्वनी अजूनही पक्षात घुमत आहेत. मुंबईच्या नेत्यांपर्यंतही या थपडीच्या आवाज पोहचला असून त्या भयंकर आवाजाने त्यांनाही कानठाळ्या बसल्याचे बोलले जाते. 
नगरसेविका तर जिंकली पण तिच्या पैनेलमधील एक खास सहकारी पराभूत झाला, ही गोष्ट तिच्या चांगलीच जिव्हारी लागली. आणि त्या रागातून हे थप्पडनाट्य घडल्याची जोरदार चर्चा आहे. संबंधित महिला पदाधिकाऱ्याने त्या सहकारी उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा त्या नगरसेविकेला संशय होता. तिला समोर पाहताच त्या शिघ्रकोपी नगरसेविकेच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.

अत्यंत सुसंस्कृत व शिस्तबद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या विजयोत्सवाला या असंस्कृत थपडीमुळे गालबोट लागल्याने नाराजी व्यक्त होत आहे. भाजपमध्ये थप्पड संस्कृती रुजू नये, यासाठी वरिष्ठ नेत्यांनी वेळीच लक्ष घालावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. आयुष्यभर विरोधी पक्षात काम केलेल्या या शिघ्रकोपी नगरसेविकेला लगाम कसा घालायचा, ही सत्ताधारी भाजपसाठी डोकेदुखीचा  विषय झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.