महिलांनी आत्मविश्वासाने स्वत:चे अस्तित्व घडवावे – तेजश्री सातपुते

निरंजन सेवाभावी संस्था सिध्दीता महिला गटातर्फे महिला दिनानिमित्त सिद्धीता गौरव पुरस्कार  


एमपीसी न्यूज – पोलीस प्रशासनात एक स्त्री म्हणून काम करीत असताना या पदाची जबाबदारी तितक्याच तत्परतेने पेलली. या क्षेत्रात काम करीत असताना अनेक आव्हाने समोर आली. परंतु स्वत:वरील आत्मविश्वासाच्या बळावर या आव्हानांवर मात केली. महिलांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करताना अनेक संकटे येतात. परंतु आपण आत्मविश्वासाने त्यावर मात करायला हवी, असे मत गुन्हे अन्वेषण विभागातील आयपीएस अधिकारी तेजश्री सातपुते यांनी व्यक्त केले.

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे पत्रकार भवन येथे महिला दिनानिमित्त सिद्धीता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का शहा, जयश्री बागुल, बांधकाम व्यवसायिका प्रियांका अभ्यंकर, अंजली लाळे, आयटी क्षेत्रातील गीता सिंग, मिनल महाजन, केतकी तावरे, आदी उपस्थित होत्या.

यावेळी कर्तृत्व सिद्ध करून आपली नवी ओळख निर्माण करणा-या भारती अंकलेलु, मृणाल सावंत, राजलक्ष्मी शिंदे पाटील, हेमा कणसे, शिल्पा चौघुले, मनिषा धुमाळ, सारीका कोळी, राजश्री या 8 महिलांना सिद्धीता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रात कार्य करणा-या या महिलांनी आपली यशोगाथा उलगडली. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्राजक्ता कोळपकर, माधुरी तुपे, वैशाली कासट, भारती होले, रेश्मा भट्टड, हर्षल लढे, अंजली मिणियार यांनी केले.

प्रियांका अभ्यंकर म्हणाल्या की, मराठवाड्यातील एका छोट्या खेड्यात 10 वी झाल्यानंतर पुढे शिक्षण घेऊन मुलगी पदवीधर होणार ही गोष्ट गावात माझी खिल्ली उडविणारी ठरली. परंतु घरातील माणसांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आज या पदावर मी उत्तमरित्या कार्यरत आहे. जगाला आपण तसेच दिसतो, जसे आपण स्वत:ला बघतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वत:ला कमी न लेखता निर्भिडपणे पुढे आले पाहिजे. स्त्रियांना सक्षम होण्यासाठी आधाराची नाही, तर आत्मविश्वासाची गरज आहे.

उल्का शहा म्हणाल्या की, चूल आणि मूल या परिघा पलिकडे जाऊन स्त्रियांनी काहीतरी करावे, हा उद्देश समोर ठेवून समाजकार्याला सुरुवात केली. घराची जबाबदारी सांभाळत फावल्या वेळात महिलांच्या व मुलांच्या प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली. समाजातील प्रत्येक स्त्रीने सक्षम व्हावे या दृष्टीने अजूनही काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. प्राजक्ता कोळपकर यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी तुपे यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.