व्यवसायातून ‘ती’ खुलवतेय ‘तिचे’ कुटुंब

…त्या महिलांना  हवीय आर्थिक मदत आणि माणसातले माणुसपण
 

एमपीसी न्यूज – महिला या शब्दाबरोबर प्रेम, वात्सल्य, स्नेह, ममता या भावना समोर येतात. पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही समोर उभी राहते. कारण आता स्त्रीही अबला राहिलेली नाही. ती सबलाही झालेली आहे. एकविसाव्या शतकात स्त्रीने स्वत:ची शक्ती ओळखली आहे. ती आपल्या अधिकारांसाठी झगडणेही शिकली आहे. आजच्या स्त्रीने सिद्ध केले आहे, की त्या एकमेकांच्या शत्रू नाहीत तर सहकारी आहेत. स्त्री सशक्त आहे. आणि तिच्या शक्तीची अभिव्यक्ती याप्रकारे पाहावयास मिळत आहे.   दापोडीतील आनंदवन या कुष्ठरोगी वसाहतीतील महिलांनी दाखवून दिले. जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने या महिलांनी आपले मत मांडले.

पिंपरीतील दापोडीजवळ आनंदवन म्हणून कुष्ठरोगी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये 100 कुटुंबे आपला उदरनिर्वाह करत आहे. याठिकाणी अनेक महिला बचत गट आहेत. या माध्यमांतून महिलांनी अनेक व्यवसाय सुरु केले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून ‘ती’ आपले कुटुंब चालवित आहे. ती जरी माणूस असली तरी तिला इतर माणसांप्रमाणे माणसांत राहता येत नाही. तो हक्क तिला मिळावा हीच भावना कायम तिच्या मनांत ठसठसत आहे. त्यामुळे तिच्या  व्यवसायातून ‘ती’ तिचे कुटुंब खुलविण्यासाठी झटत आहे.

आनंदवन वसाहत 1952 मध्ये स्थापण्यात आली. या आनंदवनाचे स्वाभिमानी महिला मंडळाच्या माध्यमांतून अनेक बचत गट आहे. या बचतगटाच्या माध्यमांतून  अनेक व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत येथील महिलांनी जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने व्यक्त केली. दापोडी येथील रेल्वेस्टेशनला लागूनच ही वसाहत आहे. या वसाहतीमध्ये कुटुंब आपला उदरनिर्वाह विविध व्यवसायाच्या माध्यमांतून करत आहे. मातोश्री, वैष्णवी, क्रांती, सुहासिनी, भक्ती हे बचतगट आहेत. त्यात वत्सला संगीत, लक्ष्मी कापसे,  इंदू क्षेत्री, शिताबाई कोरे, सुरेखा दोडमने, सुमन चव्हाण, रेखा कांबळे, सुनीता तेली आदी महिलांनी मिळून  ‘मिरची कांडप’ चा व्यवसाय सुरु केला.


महिलांनी त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी याठिकाणी  ‘मिरची कांडप’चा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांची फक्त एवढीच मागणी आहे की आम्ही जो माल तयार करतो तो इतर ठिकाणी विकला जावा. त्याला एक जोड मिळावी एवढीच इच्छा आहे. त्या माणूस म्हणून जगत आहेत पण त्यांना माणसात येण्यास अडचण निर्माण होत आहे.

जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने  महिलांनी एकत्र यावे आम्हांला माणसात आणावे. माणूस जरी असलो तरी माणूसपण मिळत नाही. ही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आम्ही जरी कुष्ठरोगी असलो तरी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास हातभार मिळावा. बचत गटांच्या माध्यमांतून आम्ही तयार केलेला माल जर विकत घेतला तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आम्हांला  मदत होईल. यातून आमचे कुटुंब सावरण्यास मदत होईल  सरकारने आमच्या कुटुंबासाठी योग्य पुढाकार घ्यावा.  आमच्या समस्या सोडवाव्यात, माणसातले माणूसपण मिळविण्यासाठी  प्रयत्न करावेत.  हीच इच्छा येथील महिलांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.