महापौरपद डावलल्याने ढाके समर्थकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्र्यांवर आगपाखड

हीच का पारदर्शकता, नुसतीच बोलबच्चन पोस्ट ‘व्हायरल’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी भाजपतर्फे नगरसेवक नितीन काळजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने भाजपमधील निष्ठावान नाराज झाले आहेत. महापौरपदासाठी प्रबळ दावेदार असणारे नामदेव ढाके यांच्या समर्थकांनी ”हीच का पारदर्शकता, नुसतीच बोलबच्चन अशा पोस्ट सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करीत मुख्यमंत्र्यांवर आगपाखड केली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपमधील निष्ठावान आणि आयाराम वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असलेले नितीन काळजे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत आल्यानंतर भाजपच्या जुन्या पदाधिका-यांकडून त्यांच्या नावाला विरोध झाला होता. नामदेव ढाके यांचे नाव जुन्यांकडून आघाडीवर होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नामदेव ढाके खंदे समर्थक आहेत. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचा भाजप प्रवेश ढाके यांच्या मध्यस्तीने झाला होता. जगताप यांचा देखील महापौरपदासाठी ढाके यांच्या नावाला पाठिंबा होता. त्यामुळे ढाके महापौर होतील, असे मानले जात होते.

नामदेव ढाके यांच्या नावाला भाजपच्या जुन्या पदाधिका-यांचा पाठिंबा होता. तसेच संघाची देखील त्यांच्या नावाला सहमती मिळाली होती. ढाके यांच्या समर्थकांनी चिंचवड परिसरात महापौर झाल्याची फलकबाजी देखील केली होती. त्यामुळे ढाकेच महापौर होणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ढाके की काळजे ही चुरस कायम होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे.

नाराज झालेल्या नामदेव ढाके यांच्या समर्थकांनी ”आज महापौर पदाच्या निवडीमध्ये देखील जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. मुख्यमंत्री साहेब तुम्ही शब्द दिला होता. जुन्या कार्यकर्त्यांना संधी देणार, पंरतु आज तुमचा शब्द खोटा ठरलाय, हीच का पारदर्शकता का नुसतीच बोलबच्चन” अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. त्याच्यामध्ये डाव्या बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उजव्या बाजूला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची छबी वापरली आहे.

”पक्षाने न्याय केला, एकनिष्ठता आज परत एकदा हरली, एकनिष्ठ करा कष्ट, आज काका कमी पडले, एका जंगलात दोन वाघ कधी नसतात” अशा देखील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. त्यामुळे भाजपमधील निष्ठावान आणि आयाराम यांचा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.