आज साहित्यिक वास कुठेच दिसत नाही – जब्बार पटेल

एमपीसी न्यूज – प्रायोगिक नाटकाची आवड  यशवंतराव चव्हाण यांना होती. आजकालच्या राजकारणात उथळ भाषणांचा वापर जास्त होतोय. त्यात साहित्यिक वास दिसून येत नसल्याची खंत नाट्य दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी चिंचवड येथे व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण  प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंत – वेणु पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वर्षी ज्येष्ठ निसर्ग कवी पद्मश्री ना. धो.महानोर व त्यांच्या पत्नी सुलोचना महानोर यांना  प्रदान करण्यात आला. चिंचवड येथील अॅटो क्लस्टर येथे कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील  यांच्या हस्ते झाले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल  होते.  परिमंडल तीनचे  सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके  यांनी कवी ना. धो. महानोर यांचा सत्कार केला.  

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाजीराव सातपुते  यांचे यशवंतराव-इतिहासाचे एक पान यावर विचार मांडले. यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार रामचंद्र जाधव, यशवंतराव चव्हाण सह्याद्री पुरस्कार बांधकाम उद्योजक सुदाम मोरे, यशवंतराव चव्हाण ग्रामभूषण पुरस्कार आदर्श सरपंच  शशिकांत मोरे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.


ते म्हणाले,  प्रत्येक कवीचा एक वाचक वर्ग असतो. त्यातून कविता निर्माण होते. ही कविता सहन करण्याची ताकद जी असते ती ना. धो. महानोर यांच्या पत्नीमध्ये दिसून येते. यशवंतरावांना नाटक व पुस्तके वाचण्याची खूप आवड होती. तसेच ग.दि. माडगूळकर व ना. धो. महानोर यांनी जी गाणी लिहिली ती निंदनीय आहे, असे म्हणणे बरोबर नाही. त्यातूनच त्यांच्या कवितेचा जन्म झाला.. शब्द हे समृद्ध करण्याचे काम कवी ना. धो. महानोरांनी केले.

सत्काराला उत्तर देताना कवी पद्मश्री ना. धो. महानोर म्हणाले की, शब्द बोलायला फार अवघड असतात. ते निथळ करण्याचे कामही अवघड तेवढेच असते. माझी कविता ही प्रत्येकाच्या ओठावर असते. यातच माझा हा सन्मान समजतो. आशीर्वादरुपी थाप ही पुरस्काराने मिळाली. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने, आचाराने मी वाढलो. माझे आदर्श महाकवी संत तुकाराम होत. साहित्य व कलेवर संस्कृतीचे जतन करण्याचे काम कविता करते. यशवंतराव चव्हाणांनी आपले आयुष्य हे हिरवे केले. कवितेला शक्ती त्यांच्या प्रेरणेनेच मिळाली असल्याची भावना त्यांनी पुरस्काराच्यारुपाने व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण हे माझे मार्गदर्शक आहेत.   

सुलोचना महानोर म्हणाल्या की, कवी महानोर यांच्यामुळे अनेक थोर मोठी माणसे घरांपर्यंत आली. त्यांच्यामुळे मी ओळखली गेली. ते ग्रामीण कवि आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

डॉ. पी. डी. म्हणाले की, यशवंतराव चव्हाण व माईंचे कार्य हे अतुलनीय आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे खरोखर भाग्यच असावे लागते. मी 35 वर्षात जो आनंद घेऊ शकलो नाही तो, साहित्य संमेलनाने मिळवून दिला. हा आनंद कायम लक्षातच राहील असा आहे.

यावेळी ज्येष्ठ समाजवादी  विचारवंत भाई वैद्य, रामचंद्र जाधव, सुदाम मोरे, शशिकांत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कवी दुर्गेश सोनार, रवी पाईक, भरत दौंडकर, तुकाराम धांडे, संगीता झिंजुरके यांनी  आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. सूत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.