शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदतीची तरतूद करावी; खासदार बारणे यांचे लोकसभेत विधेयक

एमपीसी न्यूज – देशाच्या संरक्षणासाठी सीमेवरती शत्रूंशी लढत असताना शहीद होणाऱ्या तसेच गंभीररित्या जखमी होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना महागाईच्या प्रमाणात भरीव आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून तरतूद करण्यात यावी जेणेकरून जवानांच्या कुटुंबीयांना त्यांची उपजीविका भागविता येईल व मुलांचे शिक्षण पूर्ण करता येईल, अशा आशयाचे खासगी विधेयक खासदार श्रीरंग बारणे यांनी आज लोकसभेत सादर केले.

देशाचे संरक्षण करण्यासाठी सीमेवरील जवान रात्रंदिवस तत्पर असतात आणि प्रसंगी जीवाची परवा न करता आतंकवादी तसेच शत्रूंशी दोन हात करीत असतात. अशा परस्थितीत आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काही जवान शहीद तर काही जवान गंभीररित्या जखमी होतात आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आपली उपजीविका भागविणे कठीण होते. या जवानांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदत  मिळणे अत्यावश्यक असते. परंतु सद्य स्थितीत जी आर्थिक मदत जवानांच्या कुटुंबीयांना मिळते. ती महागाईच्या तुलनेने अत्यंत कमी प्रमाणात असल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण, घर खर्च व इतर उपजीविकेच्या साधनांसाठी ही रक्कम अपुरी पडते.

याच अनुषंघाने खासदार श्रीरंग बारणे यांनी खासगी विधेयक लोकसभेत सादर करून सरकारचे लक्ष याकडे वेधले आणि या विधेयकात असे नमूद केले की, आतंकवाद्यांचे सीमेवरती होणारे उल्लंघन आणि अतिरेकी कारवायांना आपले जवान नेहमीच जोरदार प्रतिउत्तर देतात. अशा आतंकवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या तसेच गंभीर जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी देशातील नागरिक आणि विविध सामाजिक संस्था सुद्धा मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. परंतु केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी आणि ही तरतूद महागाईच्या प्रमाणात असावी.

या जवानांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य सुविधा पुरविणे, मुलांचे मोफत शिक्षण, स्वयं रोजगारासाठी कर्जाची विशेष सुविधा पुरविणे, त्याचबरोबर त्यांना जीवनावश्यक सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात हीच खरी श्रद्धांजली या शूरवीरांना ठरेल अशा आशयाचे खाजगी विधेयक खासदार बारणे यांनी लोकसभेत सादर केल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

spot_img
Latest news
Related news