निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्ग सोमवारपासून दुचाकींसाठी होणार खुला

एमपीसी न्यूज – निगडी ते दापोडी या रस्त्यावर उभारलेला बीआरटीएस मार्ग दुचाकीचालकांसाठी सोमवार (दि.20) पासून बीआरटी बस सुरू होईपर्यंत खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.
महापालिकेमार्फत बीआरटीएस बससेवा सुरू करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये निगडी ते दापोडी, सांगवी ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी आणि देहू-आळंदी या पाच रस्त्यांचा समावेश आहे.
त्यापैकी सांगवी ते किवळे या रस्त्यावर बीआरटीएस बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, सर्वात आधी निगडी ते दापोडी या साडेबारा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर बीआरटीएस बससेवा सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु, या मार्गावर अशी बससेवा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन फसले आहे.
बीआरटीएसच्या उर्वरित मार्गाच्या बाजूने लोखंडी रेलिंग उभारून हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. निगडी ते दापोडी रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा मार्ग दुचाकी वाहनांसाठी खुला करण्याची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकेली होती.
त्यानंतर हा बीआरटीएस मार्ग येत्या सोमवारपासून (दि. 20) दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे, सहशहर अभियंता राजन पाटील यांनी सांगितले.

