सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

कबड्डीपट्टू घडविणारे संजय नेवाळे आता महापालिका सभागृहात!

एमपीसी न्यूज – लहानपणापासून कबड्डी खेळण्याची आवड होती. कबड्डी खेळत असताना आपण स्वत: खेळण्यापेक्षा महाराष्ट्राच्या मातीतील खेळ टिकविण्यासाठी कबड्डीपट्टू घडविण्याचा ध्यास घेणारे संजय नेवाळे आता पिंपरी महापालिकेचे नगरसेवक झाले आहेत. कबड्डीपट्टूंना मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार  करणार असल्याचे, नेवाळे यांनी  ‘एमपीसी न्यूजशी’ बोलताना सांगितले. 

प्रभाग क्रमांक 11 कृष्णानगर, पूर्णानगर, घरकुल योजना या प्रभागातून संजय बबन नेवाळे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 

संजय नेवाळे नावाजलेले कबड्डीपट्टू आहेत. जिल्हा, राज्यपातळीवर कबड्डी खेळले आहेत. ब्रम्हा, विष्णु, महेश या नावाने त्यांनी कबड्डी संघ सुरु केला आहे. त्या माध्यमातून ते कबड्डीपट्टू घडवत आहेत. त्यांच्या संघातील दोन खेळाडूंनी महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. 

कबड्डीचा संघ चालू केल्यानंतर नेवाळे यांनी कबड्डीची आवड असणा-या गोरगरिब कुटुंबातील मुलांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांना कबड्डी खेळण्यास आर्थिक मदत करत प्रोत्साहन दिले. नेवाळे यांनी 2013 मध्ये चिखलीत राजस्तरीय कबड्डी स्पर्धा घेतल्या होत्या. महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डी हा खेळ टिकविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कबड्डीपट्टूंना राज्य, देशपातळीवर खेळायला जाण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार, असल्याचे नेवाळे यांनी सांगितले. 
 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने कबड्डीचा संघ तयार करावा. त्यामध्ये कबड्डीची आवड असणा-या शहराच्या विविध भागातील खेळाडूंना घ्यावे. त्यांना खेळण्यासाठी मदत करुन प्रोत्साहन द्यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, नेवाळे यांनी सांगितले. 

प्रभागातील नागरिकांना पाणी, वीज, अंतर्गत रस्ते या मूलभुत सुविधांबरोबरच  सर्व आरक्षणे ताब्यात घेऊन विकसीत करणार आहे. तसेच क्रिडांगण, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र करणार असल्याचे, नेवाळे यांनी सांगितले. 
 

नेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष होते. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तरुणांच्या एकजुटीचा आणि प्रभागातील नागरिकांचा हा विजय असल्याचे, नेवाळे यांनी सांगितले. तसेच शेवटपर्यंत आपण कार्यकर्ते म्हणून काम करणार आहे, असेही ते म्हणाले.

"dipex"

spot_img
Latest news
Related news