अभियंत्याला फेसबुकची ओळख पडली 21 लाखात

गिफ्ट पाठविण्याच्या आमिषाने फसवणूक 
एमपीसी न्यूज – फेसबुकवर मैत्री झालेल्या लंडन येथील महिलेने गिफ्ट पाठविते, असे सांगून चिखलीतील एका अभियंत्याची 21 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. 

याप्रकरणी पल्लब दीपक दत्ता (वय 37, रा. सुदर्शननगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बेरी ट्रेसी (रा.यु.के लंडन) हिच्यासह इतर आठ ते दहा बँक खातेरादारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर 2016 या कालावधीत हा प्रकार घडला. 

पल्लब दत्ता यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. सातारा, शिरोळ येथील एका खासगी कंपनीते ते व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. रुपीनगर येथे त्यांचे कुटुंब राहत आहे.  जून 2016 मध्ये बेरी ट्रेसी नामक लंडन येथील महिलेने पल्लब दत्ता यांना फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली.

पल्लब यांनी ती स्विकारली. त्यानंतर समोरील महिलेने पल्लब यांच्याशी मैत्री केली.  भारतात मी कंपनी काढणार आहे. मला तुमची मदत लागणार आहे, असे तिने सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.  6 सप्टेंबर 2016 रोजी बेरी ट्रेसी हिने 44-7937453876 या मोबाईल क्रमांकावरुन पल्लब यांच्याशी संपर्क साधला आणि एक गिफ्ट पाठविते असे सांगितले.

त्यासाठी काही पैसे लागतील असे सांगत वेळोवेळी विविध कारणे सांगून स्टेट बॅक ऑफ इंडिया या बँकेच्या वेगवेगळ्या खात्यादारांचा खात्यामध्ये पल्लब यांना पैसै भरायला लावले.  पल्लब यांनी एकूण 21 लाख 38 हजार रुपये भरल्याचे, पोलिसांनी सांगितले.  

पैसे भरुनही गिफ्ट आले नाही. त्यामुळे पल्लब यांनी बेरी ट्रेसी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता  त्यांनी फोन उचलण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. निगडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे तपास करत आहेत.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.