एमपीसी न्यूज – लहानपणापासून आंबेडकर चळवळीत काम केले. चळवळीच्या माध्यमातून समाजासाठी झटणारे विकास डोळस आता पिंपरी महापालिकेचे नगरसेवक झाले आहेत. दिघी-बोपखेल प्रभागात भव्य असे ‘संविधान भवन’ उभारणार असल्याचे, नगरसेवक डोळस यांनी ‘एमपीसी न्यूजशी’ बोलताना सांगितले.
प्रभाग क्रमांक 4 दिघी-बोपखेल प्रभागातून विकास हरिश्चंद्र डोळस भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.
विधानसभा निवडणुकीपासून डोळस यांनी आमदार महेश लांडगे यांच्यासोबत राजकरणात काम करण्यास सुरुवात केली. महापालिका निवडणुकीत आमदार लांडगे यांनी डोळस यांना भाजपची उमेदवारी दिली. प्रभागातील नागरिकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे ते मोठ्या मताच्या फरकाने विजयी झाले.
विकास डोळस इलेक्ट्रानिक इंजिनिअर आहेत. त्यांनी काही वर्ष शिवाजीनगर येथे एका खासगी कंपनीत नोकरी देखील केली. नोकरी सोडून त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. लहानपणापासून ते आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. व्यवसाय बघत ते चळवळीत सक्रिय काम करत आहेत.
दहावीत असताना 1998 साली विज्ञानामध्ये 150 पैकी 146 गुण मिळाले होते. त्यावेळी महापालिकेने मला पाच हजार रुपयांचे बक्षिस दिले होते, अशी आठवण सांगत ते म्हणाले ज्या महापालिकेने मला बक्षिस दिले. त्या महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
दिघी-बोपखेलचा पिंपरी महापालिकेत समावेश होऊन 20 वर्ष झाले. मात्र, प्रभागात अजूनही मुलभूत सुविधांची वानवा आहे. अंतर्गत रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा नागरिकांना देणार आहे. प्रभागातील सर्व आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करणार असून क्रिडांगण, उद्यान, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र प्रभागात करणार असल्याचे, डोळस यांनी सांगितले. तसेच दिघीतील डोंगराचे सुशोभिकरण आणि संवर्धन करणार आहे.
दिघी-बोपखेल प्रभागात देशातील सर्वांत चांगले ‘संविधान भवन’ प्रभागात करण्याचा माझा मानस आहे. त्यामध्ये संविधानाने सर्वसामान्य नागरिकाला दिलेले हक्क सांगितले जाणार आहेत. संविधान तज्ज्ञांना बोलावून व्याख्यानाचे आयोजन केले जाणार आहे. संविधानाचे मोठे संग्रहालय, ग्रंथालय, स्पर्धात्मक परिक्षा केंद्र सुरु करणार असल्याचे, डोळस यांनी सांगितले.
दिघी-बोपखेल प्रभागातील नागरिक, भोसरीचे आमदार महेश लांडगे, कुलदीप परांडे आणि डोळस बंधूमुळे निवडून आल्याचे, विकास डोळस यांनी सांगितले.