अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी शिक्षकाला अटक

एमपीसी न्यूज – शिकवणी वर्गाला आलेल्या 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका शिक्षकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी (दि.15) दुपारी दोन ते चारच्या सुमारास संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली.

राजेश नारायण जोशी (वय 54, रा. संत तुकारामनगर, पिंपरी), असे अटक केलेल्या शिकवणी वर्गाच्या शिक्षकाचे नाव आहे. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी राजेश हा संत तुकारामनगर येथे खासगी शिकवणी वर्ग घेत आहे. फिर्यादी यांची दहा वर्षाची मुलगी त्याच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून शिकवणी वर्गाला जात होती. आरोपी राजेश गेल्या काही दिवसांपासून तिच्यासोबत अश्लिल वर्तणूक करत होता.

पीडित मुलगी बुधवारी दुपारी शिकवणी वर्गाला गेली होती. त्यावेळी आरोपी राजेश याने तिला शिकवणी वर्गाच्या आतमधील खोलीमध्ये नेले. पुस्तक वाचण्यास सांगितले आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे, पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलीने रात्री घरी गेल्यानंतर आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरोधात फिर्याद दिली. पिंपरी ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.