लोकमान्यांवरील चित्रपट प्रदर्शित करावा यासाठी पुण्यात सह्यांची मोहीम

एमपीसी न्यूज- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावरील चित्रपट त्वरित प्रदर्शित करावा, या मागणीसाठी सजग नागरिक मंचातर्फे गुरुवारी (1 ऑगस्ट) सह्य़ांची मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणेकरांच्या सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने विविध कार्यक्रम हाती घेतले होते. त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व्यक्तींच्या कार्यावर चित्रपट काढण्याची योजना होती. लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून पुणेकरांच्या सह्या गोळा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात येणार आहे. मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सह्यांच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर चित्रपट तयार करण्यासाठी 2001 मध्ये अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यापैकी निर्माते विनय धुमाळे यांना सव्वा कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्सही देण्यात आला होता. पुढे नंतर उरलेले सव्वा कोटी रुपयेही देण्यात आले. संबंधित मंत्रालयास 2005-06 मध्ये या चित्रपटाच्या काही प्रती दिल्या असे सांगण्यात येत आहे. मात्र, अडीच कोटी रुपये खर्च करूनही लोकमान्य टिळक यांच्यावरील चित्रपट लोकांना आजवर पाहण्यास मिळालेला नाही.

गेली दोन वर्षे सातत्याने पत्रव्यवहार करूनही चित्रपट प्रदर्शनाबद्दल काहीही माहिती मिळत नाही, निर्माते धुमाळे यांना देण्यात आलेली रक्कम त्वरित वसूल करावी तसेच ही वसुली करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मंचाचे विवेक वेलणकर आणि वि. रा. कमळापूरकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.