उद्योग पुनर्वसन प्रकल्पाबाबत महिनाभरात अंतिम निर्णय – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – निवासी भागातील उद्योगांचे औद्योगिक भागात पुनर्वसन करण्यासाठी 1992 साली पालिकेने चालू केलेला व गेल्या 24 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाबाबत गाळ्यांचे दर ठरवून ते अर्ज केलेल्या उद्योजकांना लवकरात लवकर भाड्याने वितरित करण्याची मागणी औद्योगिक लघुउद्योग संघटनेकडून आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर नितीन काळजे यांच्याकडे केली.  पुनर्वसन प्रकल्पाबाबत सविस्तर अभ्यास करून एक महिन्यात अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. 

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील विविध समस्यांविषयी आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर नितीन काळजे यांच्यामध्ये नुकतीच पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची बैठक पार पडली. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, शहर अभियंता अंबादास चव्हाण, आरोग्य निरीक्षक विजय खोराटे आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सचिव जयंत कड, स्वीकृत संचालक प्रमोद राणे करण्यात आली. महापौर व आयुक्त यांना यावेळी पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील विविध समस्यांविषयी निवेदन देण्यात आले. भोसरी येथील समस्यांनी लघुउद्योजक हैराण झाले आहेत. यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भोसरी औद्योगिक वसाहतीतील संबंधित पुनर्वसन प्रकल्पात गाळा विकत घेण्यासाठी असलेले वाढीव दर लघुउद्योजकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे तेथे गाळे बांधून त्याचे लघुउद्योजकांना भाडेतत्वावर वितरण करावे. तळवडे, कुदळवाडी, चिखली आदी परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाण्याची गटारे आदी मूलभूत, सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि महापालिका यांची एकत्रित बैठक घ्यावी. त्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावावेत. एफ-ब्लॉक येथे अग्निशामक केंद्र उभारावे, एमआयडीसी परिसरात पीएमपीएमएल बसची सुविधा द्यावी या मागण्या लघुउद्योग संघटनेच्या शिष्यमंडळाने केल्या.

यावेळी महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लघुउद्योजकांच्या समस्यांचे त्वरीत निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिले. एमआयडीसी क्षेत्रामधील पुनर्वसन  प्रकल्पातील गाळ्यांचे काम त्वरीत  पूर्ण करावे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भरच पडेल, असा  विश्वास महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.