लोणावळा शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 33.5 कोटीचा निधी मंजूर

एमपीसी न्यूज – लोणावळा व खंडाळा शहराची तहान भागविण्यासाठी राबविण्यात येणार्‍या नवीन पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजुरी मिळाली असून या योजनेसाठी 33 कोटी 48 लाख 61 हजार 711 रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी दिली.

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपासून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. नगरपरिषदेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाकडून ही योजना मंजूर करून आणली आहे. सदरची योजना कार्यान्वित झाल्यानंतर व सध्या अस्तित्वात असलेल्या नांगरगाव येथील जलशुद्धीकरण प्रकल्प वाढीव क्षमतेसह सुरू झाल्यानंतर लोणावळा व खंडाळा शहरांना मुबलक व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. शहराच्या उंच भागात हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने विविध भागांमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यांना गँव्हिटीने पाणी जाणार असून खर्च देखील कमी होणार आहे.

सदर योजनेच्या खर्चापैकी 85 टक्के वाटा हा महाराष्ट्र शासनाचा व 15 टक्के वाटा हा लोणावळा नगरपरिषदेचा असणार आहे. शासनाच्या वाट्याचा निधी हा तिन टप्प्यात नगरपरिषदेला देण्यात येणार आहे. या योजनेच्या कामकाजाचे पहिल्या वर्षात संपूर्ण संगणकीकरण करणे, पहिल्या वर्षात किमान 80 टक्के वसुली व त्यापुढील वर्षात 90 टक्के पाणीपट्टी कर वसुली करण्याचे बंधन नगरपरिषदेला घालण्यात आले आहे. ही योजना नगरपरिषद राबविणार असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे या योजनेवर प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहे. तसेच त्रयस्थ संस्थेकडून वेळोवेळी कामाचे ऑडिट करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात 90 किमी अंतराची व दुसर्‍या टप्प्यात 40 किमी अंतराच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासह पांगोळी येथे 10 दशलक्ष लिटर क्षमतेची टाकी, हनुमान टेकडी, रामनगर व भुशी या गावांमध्ये पाण्याच्या उंच टाक्या, नांगरगाव येथे 8 लाख लिटर क्षमतेची टाकी, गोल्ड व्हॅली येथे 10.7 लाख लिटर क्षमतेची टाकी व खंडाळा फोरबे येथे दीड लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.