Mahad News: तळीये येथे दरड कोसळून 44 जणांचा मृत्यू, तब्बल 50 पेक्षा अधिक अजूनही ढिगाऱ्याखाली

एमपीसी न्यूज : महाडच्या तळीये मधलीवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत संपूर्ण गावच दरडीखाली दबलं गेलं आहे. कालपर्यंत डोंगराच्या कुशीत असलेलं हे गाव अवघ्या 24 तासात मातीच्या ढिगारा बनून राहिलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरड कोसळल्यामुळे या गावातील 35 घरे जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांचे संसार मातीला मिळाले आहेत. सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं आहे. सध्या या परिसरात बचावकार्य सुरू असून मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. मुसळधार पाऊस कोसळत असताना दरडीआड दबा धरून बसलेल्या काळाने डाव साधला आणि काही क्षणांत अनेकांचे संसार चिखलात रुतून गेले. हजारो माणसांना जीव घेऊन सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. अनेक ठिकाणी दरडी कोसल्याच्या घटना घडल्या. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. मात्र, जी माणसं बाहेर काढली जात आहे, त्यांच्यात प्राणच राहिलेले नाहीत. आतापर्यंत 44 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तब्बल 5० पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.