Pimpri: आवास योजनेच्या निविदा अवास्तव दराने काढलेल्या अधिका-यांवर कारवाई करा

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनेच्या तीनही निविदा अवास्तव दराने काढल्या असल्याचा आरोप करत निविदा काढणा-या संबंधित अधिका-यांची खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकाच्या योजनेमधून महापालिकेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील अल्प उत्पन्न असणा-या नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये च-होली येथील गृह प्रकल्पाचा दर प्रती स्के.फूट 2846 रुपये, रावेत येथील गृह प्रकल्पाचा दर प्रति स्के.फूट 2927 रुपये तर बो-हाडवाडी येथील गृह प्रकल्पाचा दर प्रती स्के.फूट. 2500 रुपये देण्यात आलेला आहे.

हे दर अवास्तव असून शहरातील बाजारभावापेक्षा जास्त दराने सदर प्रकल्पाच्या निविदा काढल्या आहेत हे सिध्द होत आहे. या प्रकल्पाचा चुकीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) काढल्यामुळे महापालिकेचे करोडो रुपये नुकसान होणार आहे. त्यामुळे या सर्व प्रकारास जबाबदार असणारे झोनिपु स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी आणि प्रकल्प सल्लागार शंशाक फडके यांचे निलंबन करुन खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.

केंद्रीय आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच या प्रकल्पाचे सल्लागार यांचीही चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही साने यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.