Dighi : विषारी औषध पिऊन मायलेकाची आत्महत्या

स्वखुशीने आत्महत्या करत असल्याची लिहिली चिठ्ठी

एमपीसी न्यूज – विषारी औषध पिऊन मायलेकाने आत्महत्या केली. ही घटना डुडुडुळगाव येथील वनविभागाच्या हद्दीत बुधवारी (दि.26) सकाळी आकाराच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान स्वखुशीने आत्महत्या करत असल्याबाबत त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली असून दोघांची ओळख पटू शकली नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, डुडुडुळगाव येथे फॉरबिया फार्म हाऊसच्या पाठीमागे वनविभागाच्या हद्दीत झुडपांमध्ये दोन मृतदेह असल्याची माहिती एका नागरिकाने दिघी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता एक स्त्री व एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या आसपास पाहणी केली असता त्यांच्याकडे एक चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये “मी आणि माझी आई स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत. याबाबत कोणाला जबाबदार धरू नये” असे लिहिले होते. तसेच पत्नीला काही पैसे दिले असल्याचाही उल्लेख होता. दरम्यान चिठ्ठीव्यतिरिक्त त्याच्याकडे कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रे न सापडल्याने दोघांची ओळख पटू शकली नाही.

मृतदेहाजवळ रोगर कीटकनाशकाच्या बाटल्या आढळल्याने त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.