Pune : अनैतिक संबंधातून एकाचा निघृण खून; दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा

एमपीसी न्यूज – अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराचा निर्घृण खून करणा-या दाम्पत्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 24 सप्टेंबर 2015 रोजी लक्ष्मीनगर येथे घडली होती.

उदलसिंग भवानीसिंग ठाकुर (वय 32), त्याची पत्नी पूनम (वय 26, दोघेही, रा. जनता वसाहत, मूळ. उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. चंद्रीकाप्रसाद मंगलप्रसाद यादव (वय 40, रा.लक्ष्मीनगर) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ नागेंद्र याने फिर्याद दिली आहे.

उदलसिंग याची पत्नी पूनम हिचे चंद्रीकाप्रसाद याच्याशी अनैतिक संबंध होते. तिने चंद्रीकाप्रसाद याच्याकडून 30 हजार रुपये उसने घेतले होते. चंद्रीकाप्रसाद तिच्याकडे दिलेल्या पैशाची वारंवार मागणी करीत होता. आपली पत्नी पूनमचे त्याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा राग तिच्या पतीच्या मनात होता. त्यामुळे पूनम आणि तिचा पती उदलसिंग यांनी मिळून दगडाने मारून निर्घृण खून केला.

24 सप्टेंबर रोजी चंद्रीकाप्रसाद हा त्याच्या 4 वर्षीय मुलीला शाळेमध्ये सोडविण्यासाठी गेला होता. परंतु तो घरी परत आलाच नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने पोलिसात फिर्याद दिली होती. त्याचा शोध घेतला असता चंद्रीकाप्रसाद हा मृतावस्थेत ठाकूर याच्या घरी मिळाला. पूनम आणि तिचा पती उदलसिंग यांनी चंद्रीकाप्रसादचा खून केल्यानंतर हातपाय बांधून त्यावर गादी टाकून मृतदेह बेडरूमध्ये ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार न्यायालयाने खून केल्याप्रकरणी जन्मठेप आणि प्रत्येकी 1२ हजार रुपये दंड तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 1 वर्षाची सक्तमजुरी आणि प्रत्येकी 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.